ऑस्ट्रेलियाची दणक्यात सुरूवात; स्टॉयनिसच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ओमानवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्ड कपमधील एकतर्फी विजयाची मालिका ऑस्ट्रेलियानेही कायम राखली. टी-20 वर्ल्ड कपमधील दहाव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मार्कस स्टॉयनिसच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कमकुवत ओमान संघाचा 39 धावांनी पराभव करत टी-20 वर्ल्ड कपमधील आपले विजयी अभियान सुरू केले.

एकीकडे अमेरिकेत खेळपट्टय़ांचा हॉरर आणि लो स्कोरर शो सुरू असताना दुसरीकडे कॅरेबियन बेटांवरही एकतर्फी सामन्यांचा कंटाळवाणा खेळ कायम आहे. नामिबिया आणि ओमान यांच्यातील सुपर ओव्हरमध्ये खेळला गेलेला सामना वगळता सर्व सामने एकतर्फीच झाले. आज ऑस्ट्रेलियानेही त्यात भर घातली.

ओमानच्या गोलंदाजांनी जखडले
डेव्हिड वॉर्नरला आज अनेक सामन्यातील अपयशी खेळीनंतर सूर गवसला, पण त्याला ना ट्रव्हिस हेडची साथ लाभली ना मिचेल मार्शची. दोघेही लवकर बाद झाले आणि ग्लेन मॅक्सवेलच्या मानगुटीवर बसलेले शून्याचे भूत टी-20 वर्ल्ड कपमध्येही दूर झाले नाही. तीन फलंदाज बाद झाल्यानंतर वॉर्नरला साथ लाभली ती मार्कस स्टॉयनिसची. या दोघांनी 102 धावांची भागी रचत ऑस्ट्रेलियन डावाला सन्मानजनक मजल मारून दिली. ओमानच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना जखडून ठेवत दहा षटकांत केवळ 56 धावाच दिल्या.

20 षटके खेळण्याचे ओमानचे लक्ष्य
ऑस्ट्रेलियाचे 165 धावांचे आव्हान ओमानला पेलवलेच नाहीत. त्यांच्या एकाही फलंदाजाने त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न न केल्यामुळे त्यांचे लक्ष्य केवळ 20 षटके खेळण्याचेच असल्याचे जाणवले. ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे ओमानची फलंदाजी ढेपाळल्यामुळे त्यांचा पराभव आधीच निश्चित झाला होता. 13 षटकांत 6 बाद 57 अशा दुर्दशेनंतर ओमानने सामना गमावलाच होता, पण त्यांनी 20 षटके फलंदाजी करण्याचे लक्ष्य पूर्ण करत सामना 39 धावांनी गमावला. फलंदाजीत षटकारांची बरसात करणाऱ्या स्टॉयनिसने 19 धावांत 3 विकेट टिपले. एकाच सामन्यात अर्धशतक आणि 3 विकेट टिपणारा तो वर्ल्ड कपमधील तिसराच खेळाडू ठरला. असा पराक्रम शेन वॉटसनने दोनदा तर ड्वेन ब्राव्होने एकदा केला आहे. विशेष म्हणजे 2012 नंतर अशी अष्टपैलू कामगिरी करणारा स्टॉयनिस पहिला खेळाडू ठरला आहे.

स्टॉयनिसचा जलवा
12 षटकांत केवळ 63 धावा फलकावर लागल्या असताना स्टॉयनिसच्या झंझावाताने ऑस्ट्रेलियन डावाला गती दिली. 15 व्या षटकात मेहरान खानला चार षटकार खेचून स्टॉयनिसने शतकी टप्पा गाठून दिला. याच षटकात पहिला षटकार ठोकताना अयान खानने त्याचा झेलही सोडला. त्यानंतर स्टॉयनिसने ओमानच्या गोलंदाजांना फोडून काढत दीडशतकी टप्पाही गाठून दिला. वॉर्नरनेही 51 चेंडूंत 56 धावा काढल्या. त्याची ही खेळी टी-20 ला साजेशी नसली तरी त्याच्या साथीमुळेच स्टॉयनिस जोरदार फटकेबाजी करू शकला. त्याने 36 चेंडूंत 6 षटकार आणि 2 चौकार लगावत अभेद्य 67 धावा काढल्या.