अपराजित द. आफ्रिकेचा विजयी षटकार, वेस्ट इंडीजचा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगज्जेतेपदावर डोळा ठेवून उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने मोदी स्टेडियमवर अशी तुफानी आतषबाजी केली की वेस्ट इंडीजचा प्रतिकार अक्षरशा धुरासारखा हवेत विरला. आधी वेगवान गोलंदाजांचा अचूक मारा आणि नंतर फलंदाजांची झंझावाती खेळी. या दुहेरी प्रहाराने दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीचे दार अक्षरशः लाथाडून उघडले. आता नंबर वन गटातून दुसऱया स्थानाचा फैसला 1 मार्चला हिंदुस्थान आणि वेस्ट इंडीज यांच्यातील लढतीवर ठरेल.

विंडीजचे 177 धावांचे लक्ष्य म्हणजे आफ्रिकन संघासाठी फक्त औपचारिकता ठरली. कर्णधार एडन मारक्रमने फलंदाजीला जणू तलवारीची धार दिली. 46 चेंडूंतील नाबाद 82 धावांची त्याची खेळी म्हणजे वादळाचा तडाखाच होती. चार षटकार आणि सात चौकारांनी सजलेला हा झंझावात स्पर्धेतील त्याची सहावी अर्धशतकी कामगिरी ठरली. त्याने प्रतिस्पर्ध्यांच्या गोलंदाजांना इतक्या सहजपणे सीमारेषेबाहेर भिरकावले की सामना त्यांच्यासमोर पहिल्या दहा षटकानंतरच झुकला.

आज क्विंटन डिकॉकने 24 चेंडूंमध्ये 47 धावांची स्पह्टक सलामी देत आठ षटकांत 95 धावांची भागा रचत मारक्रमच्या साथीने विजयाची भक्कम पायाभरणी केली. त्यानंतर रायन रिकल्टनने नाबाद 45 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. अवघ्या 16.1 षटकांत केवळ एक विकेट गमावून लक्ष्य पार करत दक्षिण आफ्रिकेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली.

वेगवान गोलंदाजांचा कहर

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडीजने सुरुवात दणदणीत केली. शाय होपने पहिल्याच षटकात दोन षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला. दोन षटकांत 29 धावा केल्या, पण त्यानंतर मैदानावर आफ्रिकन गोलंदाजांचे वादळ घोंगावले आणि सामन्याने रंग बदलला. पॅगिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी चेंडू हातात घेताच विंडीजची अवस्था 1 बाद 29 वरून 4 बाद 43 अशी केली. रबाडाने होप आणि शिमरॉन हेटमायरला सलग चेंडूंवर माघारी धाडले. एनगिडीने ब्रँडन किंग आणि रोस्टन चेस यांना बाद करत विंडीज फलंदाजी अपंग केली. कॉर्बिन बॉशनेही मोलाची साथ दिली. गोलंदाजांच्या या माऱयापुढे विंडीजचा झंझावात अक्षरशः नतमस्तक झाला. 7 बाद 83 या दुर्दशेनंतर विंडीज हतबल होता, पण त्यांनी धीर सोडला नाही. 

होल्डरशेफर्डची झुंजार झुंज

जेसन होल्डर आणि रोमारियो शेफर्ड यांनी 89 धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. शेफर्डचे नाबाद 52 आणि होल्डरचे 49 धावा ठोकत विंडीज 176 धावांपर्यंत पोहोचवले. हा स्कोअर प्रथमदर्शनी आव्हानात्मक वाटत होता, पण आफ्रिकेच्या सलामीवीरांनी पॉवर प्लेमध्येच हा फुगा पह्डला. 17 व्या षटकातच गाठलेल्या लक्ष्याने आफ्रिकेच्या डोळ्यांत जेतेपदाची चमक स्पष्ट दिसत होती. आज मैदानावर दक्षिण आफ्रिकन वादळ घोंघावले आणि वेस्ट इंडीज त्या वादळात उडून गेला.