आम्ही ठरल्याप्रमाणे कोलंबोला जाणार, आमची फ्लाईट बुक आहे! पाकिस्तानच्या बहिष्काराच्या धमकीवर सूर्यकुमार यादवने सोडले मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 वर्ल्ड कप 2026 ची जुगलबंदी 7 तारखेपासून सुरू होणार आहे. सर्व संघांचा कसोशीने सराव सुरू आहे. सोशल मीडियावर चाहत्यांचे द्वंद्व सुरू झाले आहे. अशातच पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध न खेळण्याचा निर्णयय जाहीर केल्याने वातावरण थोडं गरमागरम आहे. मात्र, याचा हिंदुस्थानी संघाच्या तयारीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचं टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्धच्या साखळी सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिल्यानंतर सूर्यकुमारने पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया देत विरोधकांची बोलती बंद केली आहे.

मुंबईत वानखेडे मैदानावर आयोजित ‘कॅप्टन्स मीट’मध्ये सूर्यकुमार यादवने आपली भुमिका स्पष्ट केली. टीम इंडियाची तयारी पूर्ण असून ते नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाण्यासाठी तयार आहेत. आमच्या टीमचे प्लॅनिंग ठरलेले आहे. आम्ही ठरल्याप्रमाणे कोलंबोला जाणार आहोत. आमची विमानाची तिकिटे आधीच बुक झाली आहेत, पाकिस्तानने मैदानावर उतरायचे की नाही, हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही मात्र प्रत्येक परिस्थितीसाठी आणि सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, असं म्हणत सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयाला एकप्रकारे केराची टोपली दाखवली आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीची जबाबदारी हिंदुस्थानवर नाही. आम्ही फक्त क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. बोर्ड आणि सरकार जे ठरवेल त्यानुसार आम्ही खेळू, असेही त्याने स्पष्ट केले.

नेमका वाद काय आहे?

टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये 15 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोमध्ये सामना खेळला जाणार होता. त्यामुळे चाहतेही सामना पाहण्यासाठी उत्सुक होते. महाशिवरात्रीच्या दिवशी पाकिस्तानचा धुव्वा उडवून विजयी जल्लोष करण्याच्या तयारीत हिंदुस्थानी चाहते होते, तशा चर्चा सुरू होत्या. मात्र, ICC ने बांगलादेशला स्पर्धेतून वगळल्याच्या निषेधार्थ आणि इतर काही कारणांमुळे पाकिस्तान सरकारने पाकिस्तानला हिंदुस्थानविरुद्ध सामना न खेळण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वातावरण चांगलच तापलं. या सर्व पार्श्वभूमीवर कर्णधार सूर्यकुमार यादवचे आजचे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.