‘आयपीएल’चा मार्ग मोकळा, टी-20 वर्ल्ड कप पुढे ढकलण्याची शक्यता

516

बीसीसीआयला प्रचंड नफा मिळवून देणाऱया ‘आयपीएल’ या टी-20 स्पर्धेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने सोमवारी इंग्लंडसोबत झटपट मालिका खेळण्याचा इरादा व्यक्त केल्यामुळे आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत होणारा टी-20 वर्ल्ड कप आता पुढे ढकलण्यात येणार, हे निश्चित झाले आहे. ‘आयसीसी’ची येत्या 10 जुलैला याबाबत बैठक होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. या बैठकीत स्पर्धा पुढे ढकलण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला तरी ही स्पर्धा आता केव्हा होईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे वाटत नाही.

‘बीसीसीआय’ ठरणार अडथळा
‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ला या वर्षी होणारा वर्ल्ड कप 2021 सालामध्ये खेळवायचा आहे. मात्र, पुढल्या वर्षी हिंदुस्थानात टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआय मागे येण्यास तयार नाही. त्यामुळे कदाचित नाइलाजास्तव क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 2022 सालामध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करावे लागू शकते.

देशातच होणार आयपीएल – बीसीसीआय
हिंदुस्थानात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत आयोजित करण्यात येणारी ‘आयपीएल’ स्पर्धा बीसीसीआयला परदेशात खेळवावी लागणार, अशी चिन्हे निर्माण झाली असतानाच, बीसीसीआयकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की, देशातच आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याकडे आमचे प्राधान्य असणार आहे. शेवटचा पर्याय परदेशात ही स्पर्धा खेळविण्यासाठी असेल. दरम्यान, यूएई, श्रीलंकन क्रिकेट बोर्ड व न्यूझीलंड हे देश ‘आयपीएल’ आयोजनासाठी उत्सुक आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या