
ICC T20 World Cup 2026 मध्ये वेस्ट इंडिजने आपल्या बहरदार खेळाने क्रीडा प्रेमींची मन जिंकली आहेत. आज (19 फेब्रुवारी) कोलकाता येथे पार पडलेल्या इटलीविरुद्धच्या सामन्यात संघाने पुन्हा एकदा दमदार खेळाचे प्रदर्शन केलं आणि स्पर्धेत विजयी चौकार मारला. वेस्ट इंडिजने नवख्या इटलीचा 42 धावांनी पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज शमर जोसेफने गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही कमाल केली आहे. त्याच्या या दमदार कामगिरीची सध्या क्रीड विश्वात जोरदार चर्चा होत आहे.
पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीने वेस्ट इंडिजला कडवी झुंज दिली. मात्र, विजयश्री खेचून आणण्यात ते अयशस्वी ठरले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने 165 धावांचे आव्हान इटलीला दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना इटलीने आक्रमक सुरुवात करत सामन्यात रंगत आणली. परंतू वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यापुढे फलंदाज फार काळ मैदानात टिकू शकले नाहीत. शमर जोसेफने चार फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला, तर मॅथ्यू फोर्डनेही 19 धावा खर्च करत तीन विकेट घेतल्या. विशेष बाब म्हणजे शमर जोसेफने चार विकेट तर घेतल्यात त्याच बरोबर चार अप्रतिम झेलही पकडले. एकाच सामन्यात चार विकेट आणि चार झेल ही अतिशय दुर्मिळ कामगिरी शमर जोसेफने केली आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला) अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.



























































