
अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपटात व्यग्र आहे. तिने या चित्रपटासाठी भरपूर मेहनत केली असून तिच्या या मेहनतीचं चीज होताना दिसत आहे.
या चित्रपटाचं नाव रश्मि रॉकेट असं आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्याआधी तापसीने चित्रपटातील एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. त्यावर तिला अश्लाघ्य कमेंट्सही आल्या होत्या.
पण, तापसीने आपल्या तडफदार शैलीत त्या ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. तिने जो फोटो शेअर केला आहे. त्यात तिचे व्यायामाने पिळदार झालेले पाय दिसत आहेत. त्या पायांना पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीका केली.
त्यातल्या एका ट्रोलरने तिच्यावर पुरुषासारखी दिसतेस अशी कमेंटही केली. त्यावर उत्तर देताना तिने फक्त ट्रेलरची वाट पाहा, असं उत्तर दिलं होतं. विशेष म्हणजे तापसीच्या रश्मि रॉकेटच्या ट्रेलरमध्येही चित्रपटातील साधारण अशाच समस्येविषयी मांडण्यात आलं आहे.
रश्मि रॉकेट हा एका अॅथलीट तरुणीची कथा आहे. ही तरुणी लिंग परीक्षणाला सामोरी जाते आणि नियमांच्या कचाट्यात अडकल्याने तिच्यावर कारवाई होते. त्याविरोधात ही तरुणी कसा लढा देते, त्याची कथा दाखवली जाणार आहे.
हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून झी 5 वर झळकणार आहे. या चित्रपटात सुप्रिया पाठक, अभिषेक बॅनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर यांच्याही भूमिका असणार आहेत.
पाहा ट्रेलर-

























































