
मुंबईत वाढलेले हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करणारी पालिका आता प्लॅस्टिकमुळे होणारे प्रदूषणही रोखणार आहे. यात कारवाई आणि स्वयंसेवी संस्थांकडून जमा झालेल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे. तर यातून रिजेक्ट झालेल्या प्लॅस्टिकपासून टेबल, खुर्ची, बेंच, बहुउपयोगी भांडी, कचरापेटय़ा यासारख्या टिकावू वस्तू बनवल्या जाणार आहेत. यासाठी पाच वॉर्डमध्ये कलेक्शन सेंटर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त चंदा जाधव यांनी दिली.
मुंबईत 26 जुलै 2005मध्ये आलेल्या महापुराला प्लॅस्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्यामुळे 2018मध्ये आरोग्याला घातक आणि पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे सखल भागात पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱया 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली. यानंतर नियम मोडणाऱयांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली. मात्र कोरोनामुळे ही कारवाई थंडावली होती. मात्र कोरोना आटोक्यात आल्यानंतर 1 जुलै 2022पासून पालिकेने कारवाईचा वेग वाढवला आहे. दरम्यान, प्लॅस्टिकच्या कलेक्शनसाठी ए विभाग पर्ह्ट, पी/दक्षिण गोरेगाव, आर/मध्य बोरिवली आणि सी विभागात पाच कलेक्शन सेंटर सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये जमा करण्यात आलेले आणि कारवाईत जमा झालेल्या चांगल्या प्लॅस्टिकचा पुनर्वापर केला जाणार आहे तर रिजेक्टेड प्लॅस्टिकवर प्रक्रिया करून बहुउपयोगी वस्तू बनवल्या जातील. तर आगामी काळात प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृतीसाठी पालिकेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
1 कोटी 35 लाखांचा दंड
प्रतिबंधित प्लॅस्टिकविरोधात 1 जुलै 2022 ते 31 ऑक्टोबर 2023पर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 7510 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. यामध्ये 1 कोटी 35 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर एकूण 43 प्रकरणांत न्यायालयीन कारवाई सुरू आहे.
कारवाईचा वेग वाढला
पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱया बंदी घातलेल्या प्लॅस्टिकविरोधात 21 ऑगस्ट 2022पासून 31 ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत आतापर्यंत 2159 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे. यात 54 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून चार प्रकरणांत न्यायालयीन कारवाई सुरू आहे.

























































