
बुद्ध पौर्णिमेला मचाणावरून करण्यात आलेल्या प्राणीगणनेत यावेळी वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. 2020 मध्ये 36 तर यावेळी झालेल्या गणनेत 44 वाघ दिसून आले. ताडोबाच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब ठरली.
बुद्ध पौर्णिमेला दरवर्षी मचाणावर प्रगणकांना बसवून प्राणी गणना केली जाते. यावेळी या उपक्रमाला निसर्ग अनुभव असे नाव देण्यात आले. मचाणावरून केलेली प्राण्यांची मोजणी ही शास्त्रीयदृष्ट्या कुचकामी आहे. मात्र ढोबळमानाने प्राण्यांचे अस्तित्व, त्यांची विविधता यात कळते. शास्त्रीयदृष्ट्या केलेल्या गणनेला याचा आधार मिळतो. त्यामुळे ही कवायत दरवर्षी घेतली जाते. कोरोनामुळे मागील दोन वर्षे ही गणना होऊ शकली नाही. आता ती घेतल्यानंतर प्राणीविश्वाच्या दृष्टीने आशादायी आकडेवारी समोर आली आहे. 2020 मध्ये ताडोबाच्या कोअर आणि बफर क्षेत्रात मिळून 36 वाघ होते, तर आता त्यात वाढ होऊन ही संख्या 44 वर गेली आहे. बिबट्यांची संख्याही 9 वरून 11 झाली आहे. इतर प्राणीही वाढले आहेत. मोर 231 वरून 245, रानकुत्री 743 वरून 1269 झाली आहेत. सर्वप्राण्यांची संख्याही सुमारे दीड हजाराने वाढली आहे. 2020 मध्ये 3453 तर 2022 मध्ये 4918 एवढ्या प्राण्यांची नोंद झाली आहे.




























































