
कुळजमिनी नावावर करून घेण्यात खोडा घालून शेतकऱ्यांकडून लाखो रुपयांचा मलिदा लाटणाऱ्या रॅकेटचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. निकाल बाजूने देण्यासाठी 30 लाखांची मागणी करून 21 लाखांत तडजोड करत एक लाखाची लाच घेणाऱ्या पैठणचा तहसीलदार महेश सावंतसह वकील आणि दलालास रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे आज रविवार असतानासुद्धा निकाल देण्यासाठी तहसील कार्यालय उघडे होते.
पैठण तालुक्यातील कोटय़वधीच्या कुळजमिनीचा निकाल तत्कालीन तहसीलदाराने बाजूने दिलेला आहे. पैठण तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या रॅकेटने शेतकऱयास पुन्हा नोटीस काढून फेर रद्द करण्याची धमकी दिली. नोटीस मिळताच शेतकऱयाच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने तहसीलदार महेश सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निकाल बाजूने देण्यासाठी प्रथम 90 लाख रुपये लाचेची मागणी केली. अखेर तडजोड करत हा आकडा 30 लाखांपर्यंत आला. याप्रकरणी शेतकऱयाने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. आज तहसील कार्यालयात लाचेचा पहिला एक लाखाचा हप्ता घेताना तहसीलदार महेश सावंत, ऍड. भवर आणि दलाल या तिघांना पकडले.




























































