‘टेकफॉग’ अॅपचा विरोधकांविरुद्ध वापर करणाऱ्या भाजपवर कारवाई करा! गृहराज्यमंत्र्यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने ‘टेकफॉग अॅप’च्या माध्यमातून समाजमाध्यमांचा गैरवापर केला आणि त्या माध्यमांतील पत्रकारांना मोठय़ा प्रमाणात लक्ष्य केले. ही बाब ‘द वायर’ या वेबपोर्टलने समोर आणल्यानंतरही केंद्र सरकार आणि केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय गप्प का? असा सवाल गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केला आहे. केंद्र सरकारने पक्षीय राजकारण बाजूला ठेवून याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

सतेज पाटील यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक ट्विट केले आहे. ‘टेकफॉग’द्वारे भाजपने देशातील नागरिकांचे व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केले. हा एक अत्यंत गंभीर गुन्हा असून नागरिकांचा वैयक्तिक अधिकार आणि आयुष्यावरील घाला आहे, असे पाटील यांनी त्यात नमूद केले आहे. ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर आपल्या सोयीचे मेसेज पसरवण्यासाठी भाजपने या अॅपचा वापर केल्याचे ‘द वायर’ने उघड केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.