ओव्हरलोड वाहतुकीवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

इन्सुली आरटीओ चेक पोस्टवरून बेकायदा ओव्हरलोड वाहतूक होत असल्याने तेथील ग्रामस्थ व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अनेक जण अपघातात मृत्युमुखी पडले आहेत. काहींना अपंगत्व आले आहे. त्यामुळे या ठिकाणावरून होणारी ओव्हरलोड वाहतूक तात्काळ बंद करा; अन्यथा 14 नोव्हेंबरला इन्सुली चेक पोस्ट समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा निगुडे येथील महेश अंकुश सावंत यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील निगडे तेली वाडी येथील महेश सावंत यांनी सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक शिंदे यांची भेट घेत निवेदन सादर केले. या निवेदनात असे म्हटले आहे की, झाराप-पत्रादेवी महामार्गावरून इन्सुली चेक पोस्ट समोरून दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात ओवरलोड खनिज वाहतूक भरधाव वेगाने होत आहे. यामुळे ध्वनि प्रदूषणाबरोबरच येथून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थांच्या व वाहनधारकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अपघाताच्या प्रमाणातही वाढ झाली असून रस्त्यावरील अपघातात मुळे अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व पत्करावे लागले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ)चे लक्ष वेधूनही ओव्हरलोड बेकायदेशीर वाहतुकीवर निर्बंध आलेला नाही. सदर तक्रारीकडे सोयीस्कररित्या डोळेझाक होत आहे.

इन्सूली चेक पोस्ट समोरून होणाऱ्या बेकायदेशीर ओवरलोड वाहतुकीच्या मुद्द्याबाबत तहसीलदार सावंतवाडी यांचे लक्ष वेधूनही दखल घेतली जात नाही. सदर बेकायदेशीर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या डंपरची उंची तपासली जात नाही. ओवरलोड वाहतूक होत असतानाही डंपर ना वाहतूक पास देण्यात येत आहे. त्यामुळे इन्शुलिन फोर समोर वजनाची मोजमाप करण्यासाठी शासकीय वजन काटा उभारण्यात यावा तसेच सीसीटीव्ही बसवून 24 तास तपासणी पथक तैनात करून ओवरलोड वाहतुकीवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

दरम्यान, या ओवरलोड वाहतुकीवर कारवाई न झाल्यास 14 नोव्हेंबर रोजी इन्सुली आरटीओ चेक पोस्ट समोर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशाराही निगडे येथील महेश सावंत यांनी दिला आहे.