एक एक व्यक्ती फोडण्यापेक्षा थेट निवडणुका घ्या! उद्धव ठाकरे यांचं विरोधकांना थेट आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी शीव (सायन-कोळीवाडा) भागातील निष्ठावंत शिवसैनिक ‘मातोश्री’ येथे दाखल झाले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जमलेल्या शिवसैनिकांची आपुलकीनं विचारपूस करत त्यांना मार्गदर्शन केलं. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र, मात्र विरोधकांना माझं आव्हान आहे की असं एक एक फोडण्यापेक्षा निवडणुका घ्या, असं उद्धव ठाकरे यांनी सुनावलं.

शीव येथील निष्ठावंत शिवसैनिक आज ‘मातोश्री’वर पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी तुम्ही इकडे कशाला आलात? असा सवाल करताच पक्ष कार्यकर्ते म्हणाले आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिवसैनिक तुमच्या सोबत आहे हे सांगायला आलो. यावर ‘सायन कोळीवाडा हा आपला गड आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. एक माझ्या लक्षात येत आहे की कुणी गेल्यानंतर आपल्या सागराला अधिक उधाण येतं. ते उधाण रागाचं, त्वेषाचं, जिद्दीचं आहे आणि जिंकण्याची इर्ष्याही आपली आणखी वाढते. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. फक्त मला एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी गेल्यानंतर पक्षाशी गद्दारी करता कामा नये आणि पक्षाच्या विरुद्ध काम करता कामा नये. नाहीतर मग आपल्याला शिवसैनिक म्हणून जे करायचं ते करावं लागेल’, असं म्हणत त्यांनी खणखणीत शब्दात इशाराही दिला.

‘कोणत्याही परिस्थितीत आपले हे बालेकिल्ले आहे ते राखालयला तुम्ही समर्थ आहात. त्यात मला चिंता नाही. आपल्यामध्ये जे आणखी भरतीचं उधाण येतं आहे ना त्याच्यानं त्यांना धक्के बसत आहेत, की एवढं होऊ सुद्धा शिवसेना संपत नाही. हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. शिवसेना संपत का नाही? उद्धव ठाकरे संपत का नाही? प्रत्येक वेळा ते उद्धव ठाकरेंवर बोलतात. कारण त्यांना माझी धास्ती नाही तर ती तुमची धास्ती आहे. त्यामुळे एक एक फोडण्यापेक्षा एकदा निवडणुका होऊनच जाऊ दे. घ्या निवडणुका’, असं आव्हान त्यांनी पुन्हा एकदा दिलं.