‘तलाक-ए-हसन’वर 22 जुलैला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme court

‘तलाक-ए-हसन’ या मुस्लिमांमधील क्रूर प्रथेविरुद्ध दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 22 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ‘तलाक-ए-हसन’ या प्रथेनुसार पत्नीला तलाक देण्यासाठी पतीला सलग तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा ‘तलाक’ असे उच्चारावे लागते. त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला असे मुस्लिम समाज मानतो.

ज्येष्ठ वकील पिंकी आनंद यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि हिमा कोहली यांना यासंदर्भातील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्यासाठी विनंती केली होती. ही याचिका एका महिलेने दाखल केली आहे. याचिकाकर्त्या महिलेला घटस्फोट देण्यासाठी तिच्या पतीने ‘तलाक-ए-हसन’ या पद्धतीचा वापर केला आहे. त्यामुळे तीन महिने होण्यापूर्वी तिच्या याचिकेवर सुनावणी झाल्यास तिला न्याय मिळू शकेल, अशी विनंती पिंकी आनंद यांनी केली होती. ती सरन्यायाधीश रमणा यांनी मान्य केली. मुस्लिम समाजातील या तलाक पद्धतीमुळे गरीब कुटुंबातील मुस्लिम महिलांची आणि त्यांच्या मुलांची आयुष्ये उद्ध्वस्त होत असल्याचे सांगितले जाते.