
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुतक्की हे हिंदुस्थान दौऱयावर आले आहेत. या दौऱ्यात ते हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तालिबानी सरकारच्या नेत्याचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे.
अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेतल्यानंतर 2021 साली तालिबानने तिथे सत्ता हाती घेतली होती. मात्र संयुक्त राष्ट्रसंघाने तालिबानी राजवटीला अद्याप मान्यता दिलेली नाही, मात्र संयुक्त राष्ट्रांनी प्रवासाची मुभा दिल्यामुळे मुतक्की यांना हिंदुस्थान दौरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत मुतक्की यांचा हिंदुस्थान दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारपुढे पेच
हिंदुस्थानने अफगाणिस्तानातील तालिबानी सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या ध्वजालाही मान्यता नाही. अफगाणिस्तानच्या दिल्लीतील दूतावासात अद्यापही जुना राष्ट्रध्वज आहे. राजनैतिक प्रोटोकॉलनुसार दोन्ही देशांचे प्रतिनिधी भेटतात तेव्हा त्यांच्या मागे किंवा टेबलावर त्या त्या देशांचा ध्वज असतो, मात्र आता मुतक्की हे जेव्हा जयशंकर यांना भेटतील तेव्हा नेमके काय करायचे असा पेच सरकारसमोर आहे.