
तळोजा येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना पळून गेलेला कुख्यात आरोपी राजेश चंद्रकांत जाधव(26) याला नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मोरगाव- नालासोपारा येथून शिताफीने अटक केली आहे.
तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असलेला न्यायबंदी सराईत गुन्हेगार राजेश चंद्रकांत जाधव हा कारागृहातील सुरक्षेला तडा देऊन पळून गेला होता.या बाबत खारघर पोलीस ठाण्यात भा. द.वि.224 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी मध्यरात्री सदर फरार आरोपी नालासोपारा,ठाणे येथे असल्याची खात्रीशीर बातमी नवी मुंबई गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांना मिळाल्याने तत्काळ नवी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक नालासोपारा येथे रवाना झाले होते. पोलिसांनी सापळा रचून मोरेगाव-नालासोपारा येथून त्यास पहाटेच्या सुमारास मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले. कारागृहातून पलायन केलेल्या या आरोपीस पकडण्यासाठी नवी मुंबई पोलिसांकडून सतत पाठपुरावा सुरूच होता. मात्र हा इसम सराईत गुन्हेगार असल्याने मुंबई व ठाणे परिसरातील अनेक गुन्ह्यांमध्ये या पूर्वी कारागृहात गेला होता.
त्याच प्रमाणे अनेक गुन्ह्यांमध्ये त्याला शिक्षा झाल्यामुळे तो पळून गेल्यानंतर पुन्हा पकडला जाऊ नये यासाठी स्वतःचे अस्तित्व लपवून विविध ठिकाणी वेश बदलून राहत होता.अखेर पोलिसांच्या जाळ्यात पुन्हा एकदा सापडल्याने त्याला जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर,सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश तांबे व तळोजा कारागृहाचे तुरुंग अधिकारी टोणगे यांनी केली आहे.




























































