
सामना ऑनलाईन । नाशिक
त्र्यंबकेश्वर येथे ‘उटीच्या वारी’निमित्ताने संत निवृत्तीनाथांच्या संजीवन समाधीला चंदनाच्या उटीचा आणि सुवासिक आयुर्वेदिक वनौषधींचा लेप चढविण्यात आला. यामुळे उन्हाचा दाह कमी झाल्यानंतर रात्री बारानंतर उटी उतरविली जाणार आहे. या वारीसाठी हजारो भाविक त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत.
वैशाखातील उष्णतेचा परिणाम संतश्री निवृत्तीनाथ महाराज समाधीलाही जाणवतो, अशी वारकऱयांची भावना आहे. उष्णतेचा हा दाह कमी व्हावा यासाठी दरवर्षी वरुथिनी एकादशीला संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीला सुगंधी चंदनाची उटी व आयुर्वेदिक वनस्पतींचा लेप चढविण्यात येतो, त्याला ‘उटीची वारी’ म्हणतात. रात्री बारा वाजेनंतर ही उटी उतरविली जाते. ती उपस्थित वारकऱयांच्या अंगावर प्रसाद म्हणून शिंपडली जाते. या वारीसाठी हजारो वारकरी त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात संतश्री निवृत्तीनाथ महाराजांचा जयघोष सुरू होता.























































