ताम्हिणी घाटात थार कोसळली; सहा तरुणांचा मृत्यू, पुण्याहून कोकणात पर्यटनाला जाणाऱ्या मित्रांवर काळाचा घाला

पुण्याहून कोकणात पर्यटनाला जाणाऱ्या तरुणांच्या थार गाडीला ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. घाटातील रेलिंग तोडून ही गाडी तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील सर्व सहा जण ठार झाले. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात तीन दिवसांपूर्वी होऊनही याची कुणालाच माहिती नव्हती. पोलिसांनी ड्रोन कॅमेरे उडवून जंगलातील मृतदेह शोधून काढले. त्यातील एका तरुणाचा मृतदेह वर काढण्यात आला तर उर्वरित पाच जणांचे मृतदेह काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पुण्यातील या मृत तरुणांची नावे प्रथम चव्हाण (22 रा. भैरवनाथनगर कोंडवे, धावडे), पुनित शेट्टी (20 रा. पाण्याची टाकी, कोपरे गाव, उत्तमनगर), साहिल बोटे (24 रा. कोपरेगाव, उत्तमनगर), श्री कोळी (18 रा. कोपरेगाव, भैरवनाथनगर), ओंकार कोळी (18 रा. कोपरीगाव शाळेमागे, भैरवनगर) आणि शिवा माने (19 रा. भैरवनाथनगर) अशी आहेत. हे सर्व मित्र थार गाडीने पुण्याहून कोकणात पर्यटनासाठी निघाले. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही या मुलांचा काहीच संपर्क होत नव्हता. काहींचे मोबाईल वाजत होते तर काहींचे मोबाईल स्वीच ऑफ लागत होते. त्यामुळे या मुलांची कुटुंबे चिंताग्रस्त होती. प्रथम चव्हाण याच्या वडिलांनी पुण्यातील उत्तमनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला. या तरुणांचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात दाखवले गेल्याने आज पुणे आणि माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त शोधमोहीम सुरू केली.

तुटलेल्या रेलिंगमुळे शोध

ताम्हिणी घाटात एका वळणावर तुटलेले रेलिंग दिसले, त्यानंतर पोलिसांनी ड्रोन कॅमेरे उडवून शोध घेतला असता तब्बल 500 फूट दरीत थार गाडी अपघातग्रस्त झाल्याचे दिसले. गाडीत दोन मृतदेह असल्याचे पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यातून पाहिले. उरलेल्या चौघांचा शोध घेण्यासाठी जंगलाच्या दरीत ड्रोन कॅमेरे उडवले तेव्हा आणखी चार तरुणांचे मृतदेह काही अंतरावर इतस्ततः पडल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने प्रथम चव्हाण याचा मृतदेह वर आणला. उर्वरित पाच जणांचे मृतदेह वर आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पुणे-माणगाव मार्गावर वाहतूककोंडी

पोलिसांनी ताम्हिणी घाटात सुरू केलेल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे या मार्गावर दोन्ही बाजूने काही काळ वाहतूककोंडी झाली होती.