रसमलाई हे तामीळनाडूचे गद्दार, तामिळ जनतेने घेतला भाजपच्या अण्णामलाई यांचा समाचार

मुंबई हा मराठी व महाराष्ट्राचा अभिमान आहे. तामीळनाडूमध्ये निवडून आलेल्या एकाही नेत्यांनी मराठी व महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केलेले नाही. रसमलाई हे तामीळनाडूचे गद्दार आहेत, अशा शब्दांत तामिळ जनतेने भाजपच्या अण्णामलाई यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

प्रचारासाठी मुंबईत आलेल्या भाजप नेते अण्णामलाई यांनी एका मुलाखतीत मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी बॉम्बे महाराष्ट्रातलं शहर नाही तर ते आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुंबईबरोबर मराठी जनतेच्या भावना दुखावणाऱया या वक्तव्याचा सर्वत्र निषेध होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील जाहीर सभेत अण्णामलाई यांना ठाकरे शैलीत खडसावले होते. याला तामीळनाडूमधील जनतेनेदेखील पाठिंबा देत मराठी व महाराष्ट्रविरोधी वक्तव्य करणारे अण्णामलाई हे गद्दार असल्याचे म्हटले आहे.

वुई द्रविडीयन या संस्थेने राज ठाकरे यांना उद्देशून एक ‘एक्स’ पोस्ट केली आहे. ‘प्रिय राज ठाकरे, तुम्ही ज्या रसमलाईचा उल्लेख केला तो तामीळनाडूचा गद्दार आहे. त्याला तामीळनाडूचा आवाज समजू नका. आमचे मुख्यमंत्री तसेच निवडून आलेल्या एकाही नेत्याने मराठी व महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केलेले नाही. ते अशी मूर्खासारखी वक्तव्य करणार नाहीत. मुंबई ही मराठी व महाराष्ट्राचा अभिमान आहे. हे एका शाळकरी मुलालादेखील माहीत आहे, असे संस्थेने मटले आहे.