विज्ञान शिकवण्याच्या नावाखाली 40 पेक्षा जास्त विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण, शिक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी एक घटना तमिळनाडूमध्ये घडली आहे. येथील एका शिक्षकाने 40 हून अधिक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण केलं आहे. पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे.

तमिळनाडू येथील मेलूर इथल्या एका सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. आरोपी शिक्षक या शाळेत विज्ञान हा विषय शिकवतो. पण विज्ञान शिकवण्याचं निमित्त काढून तो विद्यार्थिनींशी अश्लील भाषेत बोलत असे. तो त्यांना शरीररचना, सेक्स आणि संबंधित लैंगिक विषयांच्या धड्यांना वारंवार शिकवत असे. ते विषय अश्लाघ्य पद्धतीने समजावून सांगत असे.

या शिक्षकाने स्वतःकडे एक स्टेथोस्कोप ठेवला होता. तो त्याचा वापर करून चुकीच्या पद्धतीने विद्यार्थिनींना स्पर्श करत असे. त्याने या विद्यार्थिनींचं लैंगिक शोषणही केलं होतं. हा प्रकार विद्यार्थिनींनी शाळेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कानावर घातला होता. पण, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. या तक्रारीनंतर शिक्षकाची दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली.

तक्रारींवर अंतर्गत चौकशी समिती नेमून तपास करण्यात आला. मात्र, या चौकशीत निर्दोष असल्याचं सांगत या शिक्षकाला 1 फेब्रुवारीपासून पुन्हा रुजू करून घेण्यात आलं. त्यानंतर या विद्यार्थिनींचं त्याने पुन्हा शोषण करायला सुरुवात केली. या विद्यार्थिनींनी अखेर मुलांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तक्रार केली. त्यानंतर जिल्ह्याच्या बालहक्क संरक्षण विभागाच्या अध्यक्षा डॉ. विजया सरवनन या आपल्या सदस्यांसह पोहोचल्या. त्यांनी थेट विद्यार्थिनींशी संवाद साधत आपला अहवाल बनवून पोलिसात दिला आणि त्यानंतर या विकृत शिक्षकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या.