नरवीर तानाजींच्या घरात

>> संजीवनी धुरी-जाधव

उमरठ. छत्रपती शिवरायांच्या सिंहाचे गाव. नरवीर तानाजी मालुसरे. तानाजी म्हणजे ‘गड आला पण माझा सिंह गेला’. छत्रपती शिवरायांचा जीवाभावाचा सोबते. महाराजांना कोंढाणा घेऊन द्यायचाच या ईर्षेने उदेभानास थोपवून धरले. शेवटी शेलारमामांनी उदेभानाचा खात्मा केला. तानाजींच्या बलिदानाने कोंढाणा सिंहगड झाला. पण पुढे हे महाराजांचे सखे सोबती दुर्लक्षितच राहिले. पण आज उमरठ गावी पुन्हा तानाजींचे घर उभे राहणार आहे…

छत्रपती शिवाजी महाराजांचा बालपणीचा सवंगडी….विश्वासू साथीदार…त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या मोहिमेत सहभागी असलेले…अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूंशी झुंजणारे..आपल्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं’ असे उद्गार काढणारे…आणि ज्यांच्या जाण्याने महाराजांचे अश्रू अनावर झाले असे शूरयोद्धा थोर नरवीर तानाजी मालुसरे. नुकतेच तानाजी चित्रपटामुळे जगभर पोहोचले. त्या तानाजी मालुसरेंच्या ‘उमरठ’ गावात लवकरच त्यांचे घर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी त्या गावातील हरिओम घाडगे यांनी पुढाकार घेतला आहे.

जेव्हा मुघलांनी प्रतापगडाजवळील जावळीच्या खोऱयात हल्ला केला त्यावेळी बरेच लोक मारले गेले त्यात नरवीर तानाजींचे वडीलही गेले. त्यावेळी त्यांची आई तानाजी आणि सूर्याजी या दोन्ही मुलांना घेऊन करंजेमार्गे उमरठ गावात आली आणि आश्रय घेण्यासाठी तिथल्या गुहेत दोन दिवस राहिली होती. तिथून लहान बाळांचा आवाज यायला लागल्यावर तिथे कोणीतरी राहत असल्याचे लक्षात आले. त्याच्या आजूबाजूला संपूर्ण रान होते. गावकऱयांनी चौकशी केली आणि त्यांना गावात घेऊन आले. त्यावेळी कुडपण गावचे जहागीरदार त्यांचे शेलारमामा होते. कुडपण गाव आहे पोलादपूर गावात. त्यावेळी तानाजी आणि सूर्याजी त्या गावात असल्याचे कळल्यावर लगेच शेलारमामा त्यांना भेटायला येतात आणि गावकऱयांच्या मदतीने त्यांना तिथेच एक लहान घर बांधून देतात. शेलारमामा शिवाजी महाराजांकडेच चाकरी करत होते. त्यावेळी तानाजी आणि सूर्याजी या दोघांना कवायती शिकवत. यात तलवार, भाले, दाणपट्टा कसे फिरवायचे हे शेलारमामा तिथे उभे राहून कवायती करून घ्यायचे. तिथेच नंतर तानाजी मावळ्यांना शिकवायचे. त्याच बुरुजावर त्यांचे स्मारक उभे राहिले. बुरुजाला लागूनच वीस-पंचवीस कोसावर त्यांचे घर असल्याची माहिती हरीओम घाडगे देतात. पुढे घाडगे सांगतात की माझं गाव उमरठला लागून दोन किमी अंतरावरच आहे. करंजे आणि उमरठ गाव एकाच विभागात आहे. त्यामुळे त्याकाळी आम्हाला शाळा एकच होती. त्यावेळी तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम असायचे तेव्हा आमच्यासाठी तो आनंदोत्सव असायचा. दरवर्षी पुण्यतिथीदिवशी आम्ही उमरठला जायचो, खेळ, नाटक, पोवाडे, गाणी असे विविध कार्यक्रम असायचे, तिथेच आम्ही राहायचो. यामुळे उमरठ गाव चांगलेच परिचयाचे होते. तिथे तानाजींचे स्मारक पाहिले, पण नरवीरांचे घर कधीच दिसले नाही. शाळा सोडून 29 वर्षे झाली जेव्हा मी तानाजींच्या 350व्या पुण्यतिथीला गेलो तेव्हा तिथे बराच बदल दिसला, पण त्यांच्या घराचे काहीच नसल्याचे जाणवले असे हरिओम घाडगे सांगतात.

सध्या घराची स्थिती
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीला तानाजी चित्रपटातून जगभर पोहोचले आणि त्यांचे निवासस्थान नाही. त्यावेळी माझ्या मनात आले की आपण तानाजींचे घर बांधायचे. मी एकटाच नाही तर नरवीर तानाजी मालुसरे युवा प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ उमरठ यांच्या मदतीने मी हे कार्य हाती घेतले आहे. फक्त कुणीतरी पुढे येण्याची गरज होती. आमच्या या कार्यातून सर्वांना आवाहन करतो की, या कार्यांसाठी पुढाकार घ्या, मी सुरुवात करतोय तुमच्या मदतीची गरज आहे तसेच खरोखरच मावळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर स्मारकाजवळ ऍडव्हेंचर स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा मानस असल्याचे घाडगे सांगतात.

नेमकं घर कसं असेल...
माझा पहिला हेतू त्यांचे घर उभारण्याचा आहे. घर हे प्राचीन काळातील दगडांपासून असणार आहे. पूर्वी जुन्या काळातील घरं जशी असायची तसेच हे घर असणार आहे. त्याबाबत अनेकांशी चर्चा केली, माहिती घेतली आणि आम्ही वास्तुतज्ञांशी भेटून नेमके घर कसे असणार आहे याचा आढावा घेणार आहोत. या घराचे भ्मिपूजन केले आहे. माझे सहकारी, गावकरी, नरवीर तानाजी मालुसरे युवा प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ उमरठ माझ्यासोबत आहेत. प्रत्येकाच्या हातभाराने हे कार्य पूर्ण होणार आहे. हे कार्य मी पूर्ण करणार आहे. जेवढा त्याला सगळ्यांचा हातभार लागेल तेवढे हे कार्य लवकर पूर्ण होईल. मी त्यासाठी सज्ज आहे. तसेच या कार्यात ज्यांना मदतीचा हातभार लावायचा आहे त्यांनी पुढे येण्याचे आवाहन घाडगे यांनी केले आहे.

हेतू चांगला असल्यास मदत मिळतेच
काम करणाऱयाचा हेतू चांगला असेल तर देणाऱयांचे बरेच हात उभे राहतात. आज मी स्वेच्छेने पुढे आलो आहे. उद्या या कार्यत अनेकांचे मदतीचे हात उभे राहतील. हे कार्य पूर्णत्वाकडे नेणार आहे. आम्ही कुठलीही पावती बुक छापणार नाही. ज्यांना जी मदत शक्य आहे, ती मदत करता येईल. या सगळ्याचा संकेतस्थळावर पाहता येईल. त्यासाठी आम्ही लवकरच संकेतस्थळ तयार करू.

‘तानाजी’मुळे उमरठ प्रकाशात
बरेचसे महात्मे आहेत, प्रत्येक व्यक्तीचे जन्मस्थान आहे तिथे त्यांचे निवासस्थानही पाहायला मिळते. त्या जागेचे एक वेगळे पावित्र्य असते. लोकांना त्यांचे निवासस्थान पाहण्याची उत्सुकता असते. ‘तानाजी’ चित्रपटामुळे लोकांचे या गावात येण्याचे आकर्षण वाढले आहे. एवढेच नाही तर ‘तानाजी’ चित्रपट पाहिल्यावर माझे काही मित्र उमरठला भेट द्यायला आले होते. त्यावेळी त्यांनीही तानाजींचे निवासस्थान पाहायला न मिळाल्याची खंत व्यक्त केली. त्या दिवशी खरच फार वाईट वाटले आणि आपण त्यांचे घर बांधायचे असा निर्धार केल्याचे घाडगे सांगतात.

पुढच्या वर्षापर्यंत घर पूर्ण होणार
तानाजींचे घर हे त्यांचे घरच राहणार. ते घरासारखेच असणार. जास्तीत जास्त माणसे त्या घराच्या पडवीच्या व्हरांडय़ात पंगतीने बसून जेवण करू शकतात अशी जागा ठेवू. शिवाय त्या घरात त्यांच्या शौर्याचे चित्रप्रदर्शन ठेवू. शालेय विद्यार्थी नरवीरांच्या गावी येऊन त्यांचे घर पाहतील. यासाठी माझा प्रयत्न आहे आणि नक्कीच येणाऱया 351व्या पुण्यतिथीला त्यांचे घर तयार असणार आहे. आम्ही मंडळाचे एक संकेतस्थळ लवकरच बनवणार आहोत. मंडळाचे ऑनलाइन खातेही उघडणार आहोत त्याचा हिशेब त्यावर असणार आहे. हे सर्वांचे कार्य आहे त्यामुळे आम्ही सगऴे त्यात सहभाग घेऊन ते पूर्ण करणार आहोत.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या