नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे लोकार्पण, उद्धव ठाकरे यांनी दिली मानवंदना

663

आधी लगीन कोंढाण्याचे… मग माझ्या रायबाचे, अशी गर्जना करून मगच हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा इतिहास आज उमरठमध्ये पुन्हा एकदा तळपला. निमित्त होते जीर्णोद्धार केलेल्या त्यांच्या समाधीच्या लोकार्पण सोहळ्याचे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या शूरवीराला मानवंदना देताच तुताऱयांचा निनाद घुमला. शिवरायांच्या जयजयकाराने सारा परिसर दुमदुमून गेला. भगवे झेंडे, भगव्या पताका आणि नव्या दमाचे मावळे यामुळे उमरठमध्ये जणू शिवकाळ अवतरला होता. विविध भागांतून असंख्य मराठमोळे वीर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा यांनी हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी दिलेल्या बलिदानाचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, बलिदानाचा हा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी असून गडकिल्ले हे तर महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. शिवरायांचे नाव घेतले की चैतन्य स्फुरते. स्वराज्य रक्षणासाठी मूठभर मावळे होते, पण त्यांची वज्रमूठ मजबूत होती. शिवनेरीहून माती घेऊन मी अयोध्येला गेलो आणि त्यानंतर एक वर्षातच रामजन्मभूमीचा निकाल लागला. गडकिल्ल्यांची माती ही चमत्कार घडवणारी असून शिवनेरीच्या मातीमुळेच मला मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उमरठमध्ये तानाजी मालुसरे व शेलारमामा यांची समाधी असून आज त्यांची 350 वी पुण्यतिथी होती. काळाच्या ओघात या समाधीची दुरवस्था झाली होती. रायगड जिल्हा परिषदेने या समाधीचा जीर्णोद्धार केला असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. आज सकाळी तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्या संयुक्त समाधीला केशव कळंबे व संजय महाराज कुलकर्णी यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आला. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मालुसरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर समाधी स्थळापर्यंत वाजतगाजत जंगी मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक, ऐतिहासिक चित्ररथ तसेच मिरवणुकीत सहभागी झालेले विद्यार्थी यामुळे अवघे वातावरण अंगावर रोमांच उभे करणारे होते.

या कार्यक्रमास तानाजी मालुसरे व शेलारमामा यांचे वंशजही आवर्जून उपस्थित होते. शिवकालीन शस्त्रविद्येची प्रात्यक्षिके दाखवली तेव्हा उपस्थितांचे चेहरे अभिमानाने फुलून गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केल्यानंतर त्यांना त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने तलवार भेट देण्यात आली. तसेच समाधी परिसराचे तैलचित्रही दिले. ‘तान्हाजी’ या गाजलेल्या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार भरत गोगावले, अनिकेत तटकरे, ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या