नगर जिल्ह्यात पुन्हा टँकर सुरू, पाथर्डीतील पाच गावे,47 वाडय़ांना पाणीपुरवठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिह्यात पुरेशा पावसाअभावी टंचाई जाणवू लागल्याने मध्यंतरी बंद करण्यात आलेला टँकरचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यात चार टँकरने पाच गावे व 47 वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

सव्वा महिन्यापूर्वीच जिल्हा टँकरमुक्त झाला होता. मात्र, पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. येत्या काही दिवसांतच टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, टँकर सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱयांकडे असलेले अधिकार पुन्हा प्रांताधिकाऱयांकडे सोपविण्यात आले आहेत. 5 वर्षांपूर्वी म्हणजे 2018च्या टंचाईमध्ये नोव्हेंबर महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. त्यानंतर यंदा नोव्हेंबरमध्ये पुन्हा टँकर सुरू करावे लागले आहेत. जिल्हा प्रशासनाने टंचाई आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या वर्षी 17 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. यंदा त्यामध्ये वाढ होणार आहे.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने 15 एप्रिलनंतर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याची वेळ आली होती. त्यावेळी संगमनेर तालुक्यात प्रथम टँकर सुरू करण्यात आले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सर्वाधिक म्हणजेच 94 टँकरद्वारे 48 गावे 258 वाडय़ा-वस्त्यांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. सप्टेंबरच्या अखेरीस जिल्हा टँकरमुक्त झाला होता. मात्र, अवघ्या 35 दिवसांतच जिह्यात पुन्हा टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. येत्या काही दिवसांतच ही संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.