
>> तरंग वैद्य
एका बाबाच्या आयुष्यावर बेतलेली ‘आश्रम’ या वेब सीरिजची कथा. हरयाणात काही एकर भागातला त्याचा आश्रम. आश्रम काय, एक छोटेसे शहरच. जिथे बँक, शाळा, इस्पितळ, स्टेडियमपासून सिनेमा हॉलपर्यंत सर्व काही आहे. ही जागा हिंदुस्थानात आहे, पण येथील व्यवस्था, नियम या बाबांनी ठरवलेले. अगदी जुन्या काळातील संस्थानाच्या राजाप्रमाणे तो आपले आयुष्य जगत होता. त्यांनी लोकप्रियतेचा कळसही गाठला आणि आपली लोकप्रियता रसातळाला जातानाही बघितली. या बाबांच्या पतंगाची जमिनीवरून अस्मानात झेप घेणारी आणि परत जमिनीवर येण्याची सविस्तर कथा म्हणजे ‘आश्रम’.
एक आंधळा रस्त्यावर भीक मागत असतो. एका माणसाच्या लक्षात येते की, हा आंधळा असल्याचा अभिनय करतोय. तो त्याला मदत करतो, पण सांगतो की लोकांना कळू देऊ नकोस तू आंधळा नाहीयेस. नाहीतर तुझ्यामुळे लोकांचा सर्व आंधळय़ांवरून विश्वास उठेल. अशीच काहीशी परिस्थिती सध्या आपल्याकडेही आहे. आपला देश संतमहात्म्यांचा, पण काही ढोंगी बाबांमुळे सगळेच संशयाच्या नजरेतून पाहिले जातात.
‘आश्रम’ या वेब सीरिजची कथा अशाच एका बाबाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. हरयाणात काही एकर जमिनीमध्ये त्याचा आश्रम. आश्रम काय, एक छोटेसे शहरच. जिथे बँक, शाळा, इस्पितळ, स्टेडियमपासून सिनेमा हॉलपर्यंत सर्व काही आहे. ही जागा हिंदुस्थानात आहे, पण येथील व्यवस्था, नियम हे बाबांनी ठरवलेले. अगदी जुन्या काळातील संस्थानाच्या राजाप्रमाणे तो आपले आयुष्य जगत होता. त्यांनी लोकप्रियतेचा कळसही गाठला आणि आपली लोकप्रियता रसातळाला जातानाही बघितली. या बाबांच्या पतंगाची जमिनीवरून अस्मानात झेप घेणारी आणि परत जमिनीवर येण्याची सविस्तर कथा म्हणजे ‘आश्रम’.
ऑगस्ट 2020, नोव्हेंबर 2020 आणि जून 2022 असे नऊ, नऊ आणि दहा भाग असलेले तीन सीझन श्X प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहेत आणि भाग 4 ही लवकरच येणार. इतकी या मालिकेची लोकप्रियता आहे. आपल्या देशाची जनता देवभोळी, त्यात अजूनही गावात असणारी वर्णव्यवस्था. एखादा बाबा कसे उपेक्षित वर्गाला आपलेसे करतो, कशा प्रकारे त्यांच्यात लोकप्रिय होऊन आपला शिष्यवर्ग वाढवतो, कशी गोरगरीबांची सेवा करीत असल्याचा भास निर्माण करीत आपला स्वार्थ साधतो आणि तो राजकीय नेत्यांचा आणि नेते त्याचा कसा वापर करतात हे या तीनही भागांत अगदी सविस्तर आणि मुद्देसूदपणे दाखवले आहे.
कथा बाबा निरालाची आहे. त्याचे आपले साम्राज्य आहे. जे तो आपला मित्र आणि विश्वासू भोपा महाराजच्या मदतीने चालवत आहे. त्याचे शिष्य त्याची प्रजा आहेत. शाळा, इस्पितळ सर्व काही त्याचे भक्तगण चालवतात. सगळय़ांजवळ काम आहे, पैसे आहेत म्हणून सर्व सुखी आहेत. बाबाच्या प्रत्येक आदेशाचे ते अंधभक्ताप्रमाणे पालन करतात. बाबांचे भक्त म्हणजे राजकीय नेत्यांसाठी व्होट बँक आणि म्हणूनच सत्तापक्ष काय आणि विरोधी पक्ष काय, सगळेच बाबांच्या दरबारात नतमस्तक होत असतात. बाबा निराला काही संत किंवा देव नसून ढोंगी असतो. त्यामुळे या भक्तिछत्राखाली अमली पदार्थांचा व्यवसाय, मुलींबरोबर अश्लील वर्तन व इतर बेकायदेशीर व्यवहार सर्रास चालू असतात. त्याला खरेच वाटू लागते की, तो देव आहे आणि त्यातल्या दानवाचा उन्माद वाढत जातो. म्हणतात ना, ‘पापांचा घडा एके दिवशी भरतोच.’ आश्रमात राहणारी एक भक्त मुलगी तिच्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडते आणि मग काय काय घडते हे आपण बघतो आणि नुसते बघतच नाही तर चिडतो, भडकतो, सहानुभूती दाखवतो आणि काही वेळा शरमेने मान खाली घालतो. आपल्या भावना व्यक्त होतात. कारण सर्व घटपाम तेवढय़ा ताकदीने प्रस्तुत केला गेला आहे. बाबाची पोलीस यंत्रणेवर पकड, नेत्यांबरोबरचे स्नेहसंबंध, त्याच्या विरुद्ध बोलण्याचे वाईट परिणाम, शुद्धीकरणाच्या नावाने चाललेले प्रकार दाखवणारी दृश्ये बघून मनात प्रचंड चीड निर्माण होते आणि भाबडय़ा लोकांबद्दल दया वाटते.
हिंदी चित्रपटातील नावाजलेला अभिनेता बॉबी देओलचा बाबा निराला खूप खरा वाटतो. त्याने खूप संयमित अभिनय केला आहे. बाबांची शांत, नेमकेच बोलायची शैली त्याने छान आत्मसात केली आहे. राजकीय नेत्यांशी बोलताना त्याने धूर्तपणा प्रभावी पद्धतीने दाखवला आहे. चंदन रॉय सान्याल कपटी भोपा महाराजाच्या भूमिकेत शोभलाय. आश्रमातील सेविकेच्या भूमिकेत असलेल्या त्रिधा चौधरी या अभिनेत्रीने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. बाबाची अंधभक्त ते बाबाविरुद्ध बंड पुकारणारी पहेलवान पम्मी म्हणजेच अदिती पोहणकरने आपल्या अभिनयाने सर्वांना चीत केले आहे. प्रेक्षक तिला सहानुभूतीही देतात आणि तिने बंड पुकारल्यावर तिच्या सोबत उभेही राहतात. सचिन श्रॉफ यांनी विरोधी पक्षनेत्याची चलबिचल प्रभावीपणे व्यक्त केली आहे.
प्रख्यात सिने दिग्दर्शक प्रकाश झा यांनी या वेब सीरिजचे दिग्दर्शन केले असून त्यांनी परत एकदा दाखवून दिले आहे की, दृकश्राव्य माध्यमात त्यांची पकड खूप मजबूत आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक खूप छान पद्धतीने हाताळत त्यांनी कथेची सूत्रे पुढे हलवली आहेत. कला दिग्दर्शकाचेही कौतुक! या बाबाचा हरयाणात जसा भव्य दिव्य महालासारखा आश्रम आणि परिसर होता तशीच भव्यता त्याने उभारली आहे. बाबाचा आश्रम कथेतील मुख्य स्थळ. अयोध्येतील ‘राज सदन’ या जुन्या पडक्या महालाचे एका भव्यदिव्य आणि देखण्या आश्रमरूपी महालात रूपांतर केल्याबद्दल त्याला पैकीच्या पैकी गुण. मालिकेच्या यशात या महालाच्या भव्यतेचेही महत्त्वाचे स्थान आहे.
साधारणपणे 45 ते 50 मिनिटे असे एकूण अठ्ठावीस भाग
(सीझन – 1, 2 आणि 3), प्रत्येक भाग एका ठराविक गतीने पुढे जातो. काही ठिकाणी संथ वाटतो, पण ती कथेची गरज असल्यामुळे कंटाळा आलाय असे अजिबात वाटत नाही. पहिल्या तीन भागांत आपण बाबाची लोकप्रियता अनुभवली. त्याचे ढोंगी रूप बघितले, त्याच्याविरुद्धच्या बंडात सहभागी झालो. आता बाबाला गजाआड कसे करणार हे बघण्याची उत्सुकता आहे. कारण पोलीस त्याच्या पाठीशी आहेत, राजकीय पक्षांची त्याला साथ आहे. मला असल्या ढोंगी बाबाला तुरुंगात जाताना बघायला नक्कीच आवडेल. म्हणूनच ‘आश्रम सीझन – 4’ची मी आतुरतेने वाट बघतोय.
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)



























































