
परळीतील नांदुरवेस भागातील असलेल्या 10 वर्षांच्या वयाच्या मुलाने जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर होण्याचा मान पटकावला आहे. तारांक आयाचित असे या मुलाचे नाव आहे. परळीतील तारांकच्या यशाने परळीचे नाव उंचावले आहे. तारांकचे वडील इंद्रजीत आयाचित सैन्यदलात असून सध्या ते लडाखमध्ये आहेत. तारांक अहमदाबाद येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये चौथीत शिकत आहे.
व्हाइटहॅट जूनियर ही मुंबईतील अॅडटेक स्टार्टअप आहे. त्यात मुलांना कोडिंग शिकवण्यावर भर दिला जातो. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना (वय 6 ते 18) प्रोग्रामिंग शिकण्यासाठी तयार केले जाते. त्यानंतर गेम, अॅनिमेशन आणि अॅप तयार करण्यास प्रोत्साहन देण्यात येते. त्यामुळे मुलांच्या संकल्पना आणि सृजनशीलतेला वाव मिळतो. व्हाइटहॅट जूनियर 15 मुलांना त्यांच्या स्वत: च्या स्टार्टअप तयार करण्यास आणि त्यांना फेलोशिप प्रदान करण्यास मदत करते. या उपक्रमात तारांकने स्वत:ची छाप पाडली असून तो जगातील सर्वात कमी वयाचा गेम डेव्हलपर ठरला आहे. त्याने कमी वयात बुद्धिमत्ता व प्रतिभेच्या जोरावर हे यश मिळवले आहे. या कामगिरीबाबत तारांकचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. आपल्या मुलाचा अभिमान वाटतो असे इंद्रजीत आयाचित यांनी सांगितले. तारांकने मिळवलेल्या या यशसाठी त्याचा अहमदाबाद येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये लवकरच सत्कार करण्यात येणार आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

























































