
पंजाबच्या तरन तारन जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली. उसमा गावातील माई भागो लॉ कॉलेजमध्ये तास (क्लास) सुरू होत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्याच वर्गातील विद्यार्थिनीवर गोळ्या झाडून तिची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदात स्वतःवरही गोळी झाडून जीवन संपवले.या घटनेमुळे संपूर्ण कॉलेज परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नौशहरा पन्नुआ असे मृत तरूणीचे नाव असून प्रिंस राज असे त्या मृत आरोपी विद्यार्थ्याचे नाव आहे. क्लासरूम मधील सीसीटीव्हीमध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसल्याप्रमाणे, प्रिन्स राजने वर्गात प्रवेश केला आणि वर्गात आधीपासून बसलेल्या संदीप कौरच्या डोक्यात अगदी जवळून गोळी झाडली. त्यानंतर त्याने क्षणाचाही विलंब न करता स्वत:वर गोळी झाडली. या गोळीबारात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. डीएसपी जगबीर सिंह यांनी सांगितले की, वर्ग सुरू होण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. आरोपीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप अस्पष्ट असून हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडले की काही जुन्या वैमनस्यातून, यादृष्टीने पोलीस कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींची चौकशी करत आहेत.
या घटनेनंतर कॉलेजच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भरदिवसा आणि शैक्षणिक संस्थेत घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण पंजाब हादरून गेला असून पोलीस पिस्तुल कुठून आले याचाही शोध घेत आहेत.



























































