
वर्षभर शांत राहिलेला कोविड पुन्हा डोके वर काढतोय. रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. दिवसाला एक हजारावर रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाले असून केंद्रीय औषध संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोविडबाबत सुधारीत नियमावली जारी केली आहे. ही धोक्याची नसली तरी सावध होण्याची घंटा आहे. आता जागे व्हावेच लागेल आणि मास्कसक्तीबाबत तातडीने निर्णय घ्यावा लागेल, असे मत राज्याच्या टास्क फोर्समधील तज्ञ डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय कोविड टास्क फोर्सची गेल्या 5 जानेवारी रोजी दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यात देशातील वाढत्या कोविड रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली गेली तसेच कोविड महामारीचा अनुभव पाहता सुधारीत नियमावली बनवण्यावरही एकमत झाले. त्यानुसार राष्ट्रीय औषध संशोधन परिषदेने (आयसीएमआर) सुधारीत नियमावली बनवली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत केवळ वाढत्या रुग्णसंख्येवर आरोग्य यंत्रणा बारीक लक्ष ठेवून होती; पण रविवारी एका दिवसात एक हजारांपेक्षा जास्त कोविड रुग्ण देशात आढळल्याने आरोग्य मंत्रालय अधिक सतर्क झाले असून देशातील प्रत्येक राज्याला या नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
डॉ. संजय ओक यांनी, अद्याप केंद्र किंवा राज्याकडून कोविडबाबत टास्क फोर्सला काही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत; पण सद्यस्थितीचा विचार करता आपण सजग राहण्याची गरज आहे. संसर्ग वाढू नये म्हणून मास्क घालणे अनिवार्य करण्याबाबत विचार केला पाहिजे, असे सांगितले.























































