
सामना प्रतिनिधी, मुंबई
महालक्ष्मी येथे आर्थर रोड कारागृहाच्या मागील भूखंडावर ३०० प्राणी क्षमता असलेले पालिकेचे पहिले प्राण्यांचे रुग्णालय सुरू होणार आहे. हे रुग्णालय बांधून ते चालवण्यासाठी सर दोराबजी टाटा ट्रस्टने तयारी दर्शवली आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून सभागृहाच्या मंजुरीनंतर पालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या रुग्णालयात भटक्या जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
मुंबईत पालिकेचा फक्त एकच दवाखाना खार येथे आहे तर सुमारे २०० खासगी दवाखाने आहेत. उच्चभ्रू कुटुंबांना आपल्याकडील पाळीव कुत्र्यांना, प्राण्यांना खासगी दवाखान्याचे दर परवडतात, मात्र गरीब कुटुंबांना आपल्या पाळीव प्राण्यांवर उपचार करणे परवडत नाही. त्यामुळे पालिकेने स्वतःचे पशुरुग्णालय सुरू करण्याचे ठरवले आहे. लोअर परळ डिव्हिजनमध्ये आर्थर रोड कारागृहाच्या मागील ३०४५.४० चौ. मीटर इतक्या भूखंडावर सध्या पालिकेचे श्वान नियंत्रण कार्यालय असून त्या जागेवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. या जागेवर रुग्णालय बांधून ते चालवण्यासाठी चार संस्था पुढे आल्या होत्या. त्यापैकी टाटा ट्रस्टची प्रशासनाने शिफारस केली आहे.
हे उपचार आणि विशेष कक्ष
प्रस्तावित रुग्णालयात आंतररुग्ण विभाग, शल्यचिकित्सा कक्ष, गायनॉकॉलॉजी कक्ष, अपघात व आपत्कालीन कक्ष, आयसीयू, कर्करुग्ण विभाग, त्वचा आजार कक्ष, शवदाहिनी, बाह्यरुग्ण विभाग, सीटीस्कॅन सेंटर, एमआरआय, रडिओलॉजी, सोनोग्राफी, डायलिसिस सेंटर, रक्तपेढी असे २५ विभाग असतील.
अन्य वैशिष्टय़े
सुधार समिती आणि सभागृहाच्या मंजुरीनंतर टाटा ट्रस्टशी ३० वर्षांचा करार करण्यात येणार आहे.
बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर हे रुग्णालय चालवण्यास देण्यात येणार आहे.
दारिद्रय़रेषेखालील पाळीव प्राण्यांच्या मालकांना प्राण्यांच्या उपचारासाठी सवलत देण्यात येणार आहे.
जखमी, आजारी व भटक्या जनावरांना मोफत उपचार देण्यात येणार आहेत.
प्राण्यांपासून माणसाला होणाऱया रोगांचीही माहिती मिळणार
राज्य सरकारच्या १९ व्या पशुगणनेनुसार मुंबईत एकूण सुमारे १ लाख ९५ हजार ४४८ पाळीव प्राणी आढळून आले आहेत. या प्राण्यांनाही टीबी, ब्युसेलोसिस, ग्लॅण्डर्स, सॅलमोनेलोसिस असे विविध प्रकारचे आजार होत असतात. त्यापैकी काही आजार हे संसर्गजन्य असतात, मात्र खासगी पशुवैद्यकांकडून या आजारांची माहिती दिली जात नाही. त्यामुळे पालिकेचे पशुवैद्यकीय रुग्णालय झाल्यास प्राण्यांच्या संसर्गजन्य आजारांची माहिती मिळू शकेल. तसेच माणसांना संसर्ग होऊ नये याची काळजीही घेणे शक्य होणार आहे.




























































