
गेल्या काही वर्षांपासून शरीरावर गोंदवून घेणं अर्थात टॅटू नावाचा ट्रेंड चांगलाच फोफावला आहे. याला कारण आहेत सेलिब्रिटी. दीपिकाच्या मानेवरचा रणबीरच्या नावाचा टॅटू असो किंवा अँजेलिना जोलीचा संस्कृत श्लोकांचा टॅटू. सेलिब्रिटींच्या टॅटूंची चर्चा जितकी रंगते, तितकं टॅटू काढून घेण्याची इच्छाही वाढत जाते. पण, हल्लीच हे फॅड आलंय, असं म्हणून ज्याला आधीची पिढी नाक मुरडते, ती टॅटूची कला खरंतर अत्यंत आदिम आहे.
सोशल मीडियावर या गोंदण कलेविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. ग्रामीण भागात स्त्रियांच्या अंगावर केलेले गोंदण कायमचे कसे राहते? त्यासाठी कुठली शाई वापरली जाते आणि गोंदण करण्याची प्रक्रिया कशी असते? अशा प्रश्नांना Quora या प्रश्नोत्तराच्या मंचावर सतीश राजगुरे यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे.
गोंदणकलेचा इतिहास
आदिमकाळापासून अस्तित्वात असलेली गोंदणकला म्हणजे मानवी जीवनशैलीचा सुंदर आविष्कार होती. ‘झाकू नको पाठीवरली चांदणगोंदणी बाई..’ असे गोंदणाचे रोमँटिक उल्लेख आपल्या गीतांमध्येही आढळतात. या कलेच मूळ आदिवासींच्या श्रद्धेत सापडतं. शरीरावर गोंदल्यामुळे निसर्गातील दुष्ट शक्तींपासून बचाव होतो, अशी आदिवासींची श्रद्धा होती. सावळ्या उजळ चेहऱ्यावर गोंदणाचा एक बारीकसा हिरवा ठिपका… सौंदर्यवाढीसाठी, अदृश्य शक्तींच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी, दृष्ट लागू नये यासाठी आणि विशेष म्हणजे मृत पावल्यावर गोंदून आलीस का? असे देवाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पूर्वीच्या काळातील स्त्रिया कपाळ, मान, हनुवटी अशा शरीराच्या उघड्या भागावर गोंदवून घ्यायच्या.
गोंदणकला दैवी श्रद्धा आणि सौंदर्य खुलवण्याकरिता विकसित झालेली असली तरी याचे वैशिष्ट्य म्हणजे शरीरावर गोंदवलेला ठिपका किंवा नक्षी कधीच पुसली न जाता टिकून राहते. गोंदणाची शाई वर्षानुवर्ष तशीच राहते. गोंदणे हा जादूविद्येचा प्रकार असल्यामुळे तेव्हा जादूविद्येत महत्त्वाच्या असलेल्या बिब्बा, कोळसा आणि अंजनाचा वापर केला जात होता.
स्त्री नवा जीव जन्माला घालते. म्हणून तिच्याबद्दल आदिमकालीन पुरुषाला भय आणि आदर दोन्ही वाटत असे. त्याचाच एक भाग म्हणून स्त्रीला कोणाची नजर लागू नये म्हणून तिच्या शरीरावर गोंदण्यात येऊ लागलं. नंतरच्या काळात मात्र फक्त सौंदर्य खुलवण्यासाठी गोंदवलं जाऊ लागलं. त्यामुळेच आदिवासी आणि ग्रामीण भागात गोंदण्याची कला लोकप्रिय होत गेली. कपाळ, नाक, हनुवटी, गळा, अशा विविध ठिकाणी गोंदलं जायचं. आदिवासी महिला शरीराच्या उघड्या भागावर त्रिकोणी-चौकोनी-गोल सांकेतिक चिन्ह गोंदवून घेतात.
आज फॅशन म्हणून स्त्रियांप्रमाणे पुरुषही शरीरावर टॅटू काढतात. आदिम काळात महिलाच फक्त गोंदवून घ्यायच्या. हल्ली टॅटू काढणं हे भावना व्यक्त करण्याचं माध्यम झालं आहे. श्रद्धेपेक्षा प्रेमाची निशाणी, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा भाग, लक्ष वेधून घेण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी शरीरावर टॅटू काढले जातात.
गोंदण प्रक्रिया
गोंदण म्हणजे सुई किंवा काट्याच्या साहाय्याने अंगाच्या कातडीवर नक्षी काढणे. तसेच शरीरावर चिन्ह, चित्र किंवा प्रतिमा ही चिन्हे घेण्याची क्रिया होय. यामध्ये स्वत:च्या आईवडिलांचे नाव, देवतांची नावे, प्रतिमा इत्यादी चिन्हे काढली जातात. स्त्रियांच्या हनुवटीवरचे तीन तीळ त्यांचे सौंदर्य खुलवतात, अशी धारणा असल्याने तिथेही गोंदवून घेतलं जातं.
गोंदणकलेची आजची स्थिती
महाराष्ट्रातील बहुतेक ठिकाणी वैदू समाजातील महिला गोंदणाचं काम आजही करतात. गावातल्या जुन्या जाणत्या महिला आजही गोंदतात. कोकणात गोंदण्यासाठी सुईबरोबर करवंदाचा किंवा बाभळीचा काटा घेतात. जिथे गोंदायचं तिथे घोसाळी, कारली, तोंडली आणि घेवड्याच्या हिरव्या पानांच्या रसात दिवा किंवा चुलीच्या वरची काजळी मिसळून दाट हिरवा काळा थेंब शरीरावर टाकतात. नंतर त्या थेंबातच काटा टोचतात. असे केल्याने तयार केलेल्या द्रव शरीरात टोचलेल्या ठिकाणी मुरतो. असे दोन-तीन वेळा केल्यावर काही दिवसांत गडद हिरवा ठिपका शरीरावर खुलून दिसतो.
आदिवासी समाजात गोंदण प्रक्रिया बाहेरून केली जात नाही, त्यांच्या पाड्यातील महिलाच स्त्रियांच्या हातावर गोंदवते. गोंदवण्याला धार्मिक विधी मानलं जातं. आजही ही परंपरा त्यांनी जपली असून गोंदवताना गाणी म्हणण्याची परंपरा आदिवासी समाजाने जपली आहे. गोंदवणं पूर्ण झालं की, त्या जागी एरंडेल आणि हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात.





























































