
कोरोनासारख्या भीषण आपत्तीसोबत लढणाऱया महावितरणला आता ‘तौकते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणची 48 उपकेंद्रे बाधित झाले असून, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह 3 लाख 42 हजार 385 ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करणाऱया वीज कर्मचाऱयांनी काही तासांतच 44 उपकेंद्र व 3 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे, तर कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन निर्मिती केंद्रे यांच्या अखंडित वीजपुरवठय़ासाठी सर्व वीज यंत्रणा 24 तास कार्यरत आहे.
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चक्रीवादळाशी संबंधित परिमंडलांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वकल्पना देऊन विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करून सर्व कक्ष मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी कायम संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
पुणे, सोलापूर व सातारा जिह्यात चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱयासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडलात रविवारी दुपारपर्यंत 547 विजेचे खांब कोसळले, तर 18773 रोहित्र बंद पडल्याने 869 गावांतील वीजपुरवठा विस्कळित झाला होता. मात्र, वीज कर्मचाऱयांनी अविरत परिश्रम घेऊन 15319 रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करून बाधित पैकी 797 गावे सुरू झाली, तर उर्वरित गावांमधीलही बहुतांश वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात येत आहे.
वीजपुरवठा पूर्ववत करताना कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन प्लाण्ट, इतर सर्व रुग्णालये, लसीकरण केंद्रे, मोबाईल मनोरे, पाणीपुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, संचालक (संचलन) संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व संबंधित विभागांना वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ सदैव तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.
सुरळीत वीजपुरवठय़ासाठी वादळी वाऱयात कर्मचारी कार्यरत
n चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद केला होता. या वीज बंदमुळेसुद्धा ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित झाला आहे. याशिवाय, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱयामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बाधित झाला. वादळी वाऱयात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे जनमित्र व कंत्राटदाराचे कामगार कार्यरत आहेत.
नगर जिह्यातील 5 उपकेंद्रांना फटका
नगर ः वादळाच्या फटक्यामुळे नगर जिह्यात 5 वीज उपकेंद्र प्रभावित झाले होत़े त्यापैकी ही सर्व 5 ही उपकेंद्र सुरू करण्यात आले. 119 वीज वाहिन्या बंद पडल्या त्यापैकी 47, तर 3 हजार 286 रोहित्रे बंद झाली होती. त्यापैकी 1212 रोहित्रे सुरू करण्यात आली. 299 गावेसुद्धा प्रभावित झाली. त्यापैकी अनेक गावे सुरू करण्यात आली. उर्वरित बंद असलेली यंत्रणासुद्धा पूर्ववत करण्याचे कार्य युद्धस्तरावर गतीने सुरू आहे.

































































