तौकते, अम्फानसारखेच ‘यास’ चक्रीवादळ विध्वंसक; हवामान खात्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व किनारपट्टीवर ‘यास’ नावाचं चक्रीवादळ येऊन धडकणार आहे. हे चक्रीवादळदेखील ‘तौकते’ आणि याआधीच्या अम्फान चक्रीवादळाइतकेच विध्वंसक असणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

‘यास’ चक्रीवादळामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात वादळी वारे वाहणार असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात वाऱयाचा वेग तब्बल 185 कि.मी. प्रति तास इतका असू शकतो, असा अॅलर्ट हवामान खात्यानं दिला आहे.

बंगालच्या उपसागरात पूर्व मध्य भागात कमी दबावाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. पुढील 12 तासांत हा दबाव क्षेत्र उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ 24 मेपर्यंत आणखी तीव्र होईल आणि 26 मे रोजी ओडिशाची उत्तर किनारपट्टी आणि पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱयाला धडकेल, असा इशारा हवामान विभागाच्या भुवनेश्वर उपकेंद्राच्या उपसंचालकांनी दिला आहे.

पंतप्रधानांनी घेतली बैठक

पंतप्रधान नरेंद्र मादी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. चक्रीवादळामुळे निर्माण होणाऱया परिस्थितीचा सामना करण्यासाठी संबंधित राज्ये, केंद्रीय मंत्रालय आणि संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला.

एनडीआरएफची 46 पथके

एनडीआरएफने स्थितीचा सामना करण्यासाठी 46 पथके तैनात केली आहेत. 13 टीम तैनातीसाठी एअरलिफ्ट करण्यात येणार आहेत. एनडीआरएफच्या 10 टीम स्टॅण्डबायवर ठेवण्यात आल्या आहेत. तटरक्षक दल आणि नौदलाने मदत, शोध आणि बचावकार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत.