पश्चिम महाराष्ट्रामध्ये टी.ए.व्ही.आय. हृदय शस्त्रक्रिया यशस्वी – डॉ.विजयसिंह पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओपन हार्ट सर्जरीला पर्यायी ‘ट्रान्सकेथेटर एऑर्टीक व्हॉल्व इंग्लांटेशन’ (टी.ए.व्ही.आय.) हृदय शस्त्रक्रिया कलावती माळी (वय 70, रा.मायणी, जि.सातारा) यांच्यावर सातारा जिल्ह्यामध्ये प्रथमच यशस्वी झाली असून पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही दुसरी तर महाराष्ट्रामध्ये चौथी शस्त्रक्रिया असल्याची माहिती हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विजयसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांच्या यशाबद्दल कृष्णा हॉस्पीटलचे कुलपती डॉ.सुरेश भोसले, माजी राज्य मंत्री डॉ.अतुल भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक व आभार डॉ. दिलीप सोलंकी यांनी मानले. रुग्ण कलावती माळी म्हणाल्या, ”डॉ.विजयसिंह पाटील यांनी मला व माझ्या नातेवाईकांना या शस्त्रक्रियेबाबत आवश्यक व सविस्तर माहिती दिल्यानंतर शस्त्रक्रिया करुन घेण्याचा निर्णय घेतला. अत्यंत आनंद होतो की, मला नवीन जीवन मिळाले असून मी ठणठणीत आहे. माझी सर्व दैनंदिन कामे मी स्वतः करीत आहे.”

अत्यंत अवघड व गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया प्रथमतः एवॉर्टीक व्हाल्व इम्लाटेशन हदयशस्त्रक्रिया सातारा जिल्ह्यामध्ये झाली असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, आज आपण स्पप्नवत आयुष्य जगत आहोत. दहा वर्षापूर्वीपर्यंत अत्यंत गुंतागुतींची व अशक्यप्राय मानल्या जाणाऱ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज शक्य होत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सर्वाधिक फायदा वैद्यकीय क्षेत्राला झाला असून अनेक असाध्य रोग व अवघड शस्त्रक्रिया सहज व सुलभपणे होत आहेत, असे डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले. कलावती माळी या महिलेला फुफ्फुसाचा त्रास होता. त्यांचे वजनही कमी होते. गेली 10 वर्षे त्यांना जोराची धाप लागणे, चक्कर येणे असा त्रास होता. रक्ताचा प्रवाह नियंत्रित करणारी झडप निकामी (एऑर्टीक व्हॉल्व स्टेनॉसीस) झाल्याचे लक्षात येताच झडप बदलणे आवश्यक असून माळी यांचे वय व त्यांची शारीरीक क्षमता विचारात घेता ओपन हार्ट सर्जरीने झडप बदलणे अवघड व जोखमीचे होते. ट्रान्सकेथेटर एऑर्टीक व्हॉल्च इम्पालटेंशन (TAVI) या शस्त्रक्रियेव्दारे झडप बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेमध्ये जांघेमध्ये एक छोटासा छेद घेवून कॅथेटरच्या सहाय्याने एक कृत्रिम झडप (व्हॉल्व) रक्तवाहिनीमधून हृदयापर्यंत पोहचवून जीर्ण व निकामी झालेल्या झडपेवरती बसवली जाते व झडपेचे कार्य सुरु होताच कॅथेटर बाहेर काढला जातो.

वृद्ध रुग्ण किंवा मुत्रपिंडाचा, फुफ्फुसाचा, मधुमेहाचा त्रास आहे, असे रुग्ण तसेच ज्या रुग्णांवर पूर्वी व्हाल्व बदलण्याची शस्त्रक्रिया झाली आहे, परंतु कृत्रिम व्हॉल्व योग्यरित्या कार्य करीत नाहीत अशा रुग्णांमध्ये ‘टी ए व्ही आय’ या शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला कमीत कमी त्रास होतो. छाती उघडली जात नसल्याने रुग्णाला सामान्य भुल देणे गरजेचे नसते. शस्त्रक्रियेनंतर कोणताही मोठा व्रण राहत नाही. रुग्ण अगदी 4-5 दिवसात घरी जावू शकतो. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिलेली औषधे व काही खबरदारीचे उपाय घेतल्यास रुग्ण सामान्य व आनंदी जीवन जगू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.