सर्वसामान्य प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी द्या, टॅक्सी चालकांची मागणी

519

राज्य सरकारने अनलॉक सुरू करताना खाजगी व सरकारी कार्यालये 10 ते 15 टक्के कामगारांच्या उपस्थितीत सुरू करण्यास मंजुरी दिली. बेस्टनेही सर्वसामान्य प्रवाशांसाठी आपली वाहतूक सुरू केली आहे. परंतु एकटय़ा काळ्या-पिवळ्या टॅक्सींनाच केवळ अत्यावश्यक प्रवाशांची वाहतूक करण्याचे बंधन टाकण्यात आले आहे. त्यामुळे टॅक्सी चालकांची उपासमार होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना टॅक्सीने प्रवास करण्याची मुभा द्यावी अशी मागणी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या उपसमितीने केली आहे.

वाहतूक कृती दलाच्या देखरेखीखाली नियुक्त केलेल्या रिक्षा-टॅक्सी उपसमितीची बैठक काल झाली. या बैठकीत रिक्षा-टॅक्सीच्या चालकांच्या विविध समस्या मांडण्यात आल्या. अत्यावश्यक प्रवाशांची संख्या केवळ दहा टक्के आहे. तर टुरिस्ट 20 टक्के आणि सर्वसामान्य प्रवाशांची संख्या 70 टक्के आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्याने तसेच डोमेस्टिक फ्लाइटही मर्यादित असल्याने तसेच लोकलचे प्रवासी कमी असल्याने अत्यावश्यक प्रवाशांची संख्या दहा टक्क्यांकरून पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.ल. क्वाड्रोझ यांनी सांगितले. त्यामुळे छोटे व्यापारी तसेच कामावर जाणारे कर्मचारी अशा सर्वसामान्यांना टॅक्सीतून नेण्याची परवानगी द्यावी. त्यात 3 प्लस 1 किंवा एकाच कुटुंबाचे सदस्य असतील तर 4 जणांना टॅक्सीतून जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केल्याचे क्वाड्रोझ यांनी सांगितले.

भाडेवाढ व महिन्याला दहा हजार रुपये अनुदान
– सध्या टॅक्सीचे किमान भाडे 22 रुपये आहे, त्यात 3 रुपयांची वाढ देऊन ते 25 रुपयांपर्यंत करण्याची शिफारस ही संघटनेचे नेते क्वाड्रोस यांनी उपसमितीपुढे केली आहे. रिक्षा-टॅक्सीचालकांच्या उदरनिर्वाहासाठी मासिक 10 हजार रुपये देण्यात यावेत, त्याचबरोबर रिक्षा घेण्यासाठी घेतलेले कर्ज राज्य सरकारने त्वरित माफ कराके, अशी मागणी समिती सदस्य शशांक राक यांना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या