
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईच्या भूगर्भातील बेसाल्ट, ब्रेशिया अशा प्रकारचे कठीण खडक फोडत मेट्रो रेल्वेची ‘वैनगंगा-3’ ही टीबीएम मशीन मरोळ नाक्यावरील पाली ग्राऊंड येथून 318 दिवसांनंतर आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचली. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 च्या पॅकेज 7 मधील भुयारीकरणाचा हा तिसरा टप्पा होता. ‘वैनगंगा-3’ टनेल बोअरिंग मशीनने पॅकेज 7 मधील डाऊन मार्गावर 937 आरसीसी सिमेंट रिंग्सचा वापर करत हा 1.31 किलोमीटरचा टप्पा गाठला. 150 अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल कामगार यांनी 2 एप्रिल 2018 पासून हे काम सुरू केले होते. 92 मीटर लांबीच्या या टीबीएम मशीनने रोज 4.12 मीटर भुयारीकरण केले. मेट्रो-1 आणि सहार उन्नत मार्गाखालून हे भुयार गेले आहे. मुंबई मेट्रो रेल महामंडळाने मेट्रो-3 प्रकल्पातील 52 किलोमीटर भुयारीकरणापैकी 20 किलोमीटर भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल महामंडळाने आज यशाचा आणखी एक टप्पा गाठला. मेट्रोचे-3 चे पॅकेज 7 हे मरोळ नाका येथे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो-1 ला आणि जेव्हीएलआर येथे प्रस्तावित स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजुरमार्ग-विक्रोळी या मेट्रो-6 ला जोडणार आहे.- अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल महामंडळ.


































































