आवडत्या बाई नावडत्या का होतात…?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले शिक्षक… मुलं दिवसाचे आठ तास आपल्या शिक्षकांसोबत असतात. ताई, बाई किंवा टीचर म्हणतील ती मुलांच्या दृष्टीने पूर्व दिशा असते. कारण त्यांच्या बाई किंवा टीचर कधी चुकूच शकत नाहीत. खूप प्रेमळ आणि जिव्हाळय़ाचं नातं. संस्कार, प्रेम देणारं. पण… कधी कधी या नात्याला तडा जातो. आपले आवडते शिक्षक नावडते होऊन जातात… असे का होते… काय आहेत अपेक्षा आजच्या विद्यार्थ्यांच्या आपल्या बाई किंवा टीचरकडून…

  • मैत्रीपूर्ण नातं, पण वेळ पडल्यास कठोर

माझ्या शाळेतले शिक्षक मला आवडतात. मला असे वाटते की, आमच्या शिक्षकांनी मुलांना समजेल असे सोप्या पद्धतीने शिकवायला हवे. त्यांना एखाद्या विषयाची शंका असल्यास न घाबरता अगदी बिनधास्तपणे शिक्षकांना विचारता आली पाहिजे. ते आमच्याशी अगदी मैत्रीपूर्ण वागतात पणवेळ पडल्यास तितकेच कठोर होतात. जी मुले अभ्यासात मागे आहेत अशा मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांना शिकवायला हवे.  अगदी खेळीमेळीने आम्हाला शिकवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण या सगळ्यात मला मराठी शिक्षकांचा तास आवडतो. त्यावेळी आम्हाला केवळ पुस्तकी विषय न शिकवता सामान्य ज्ञानाचीही माहिती देतात. हसतखेळत शिक्षक शिकवत असल्याने आमची सारी मरगळ निघून जाते. यांना जो विषय कठीण जातो तो त्यांना कसा सोपा करता येईन याकडे ते जातीने लक्ष देतात. सई संजय खाडे, निकुंज स्कूल, 10वी

  • मुलांमध्ये भेदभाव नको

मला माझ्या शाळेतले काही शिक्षक आवडतात. मला असे नेहमी वाटते, टीचरने आमच्याशी प्रेमाने वागावे, सारखे ओरडू नये. काही टीचर आम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवतात ते आवडतं. सारखा अभ्यास करून काही वेळेला कंटाळा येतो. त्यामुळे होमवर्क नाही दिलेलाच बरा. खरंतर गणिताची थोडी भिती वाटते, आतापर्यंत सगळे गणिताचे टीचर रागावणारेच होते. ते काही मुद्दामहून रागवत नाहीत हे खरंय. एक बरं आहे की, आमच्या शाळेत टीचर मारत नाहीत. आमच्या इथे मुली आणि मुलांमध्ये भेदभाव केला जातो. तो मला अजिबात आवडत नाही. टीचरसाठी सगळी मुलं समान असायला हवीत.

अथर्व अरविंद बागडे, 7वी, सेव्हन स्क्वेअर ऍकेडमी, मीरा रोड

  • विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्वक वागा

मला माझे शिक्षक आवडतात. आमचे सगळे शिक्षक खूप छान आहेत. त्यांनी शिकवण्याची पद्धत खूप सोपी आहे. त्यामुळे शाळेत जाण्यासाठी कायम उत्साहच असतो. हसतखेळत शिक्षक शिकवत असल्याने बऱयाचदा सामान्य ज्ञानात भर पडते. पण मला असं वाटतं की, आमच्या शिक्षकांनी मैत्रीपूर्वक राहावे, काहीवेळेला चूक नसताना ओरडले जाते. त्यावेळी फार वाईट वाटतं. आमचे शिक्षक रागवत नाही, पण काही चुकलं तर ते ओरडतात आणि चांगली गोष्ट केल्यावर शाबासकीही देतात. त्यामुळे त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती आहे. काही विषयांचे तास तासन्तास घेतले तरी कंटाळा येत नाही. शिक्षकांची शिकवण्याची पद्धत चांगली असते. एखाद्या विषयात मागे राहिलेल्या विद्यार्थ्याचा विषय चांगला होण्यासाठी शिक्षक मदत करतात.

z आधीष समर्थ पालकर, एम. ई.टी. ऋषिकुल विद्यालय, 8वी