
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्ग
माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या वतीने आज जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विषयक व शिक्षकांचे प्रश्न सोडविताना राज्यातील शिक्षण विभाग एक प्रश्न बनला आहे. शिक्षण विभागाचे धरसोडीचे शैक्षणिक धोरण व शिक्षक विरोधी भूमिका यामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात असंतोष वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या व त्यांचे समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांनी आज राज्यभर धरणे आंदोलन करण्याची आज दिली होती. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ च्या वतीने आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यात आले. या यावेळी अध्यापक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण पावसकर, पांडुरंग काळे यांच्यासह अनेक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
…..या आहेत प्रमुख मागण्या
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी तातडीने व्हावी, 20 टक्के अनुदान पात्र शाळा व तुकड्यांना सरसकट अनुदान मंजूर करावे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत 23 ऑक्टोबर 2017 जाचक अटी चा शासन निर्णय रद्द करावा, शालार्थ आयडी ची प्रकरणे तातडीने मंजूर करावे, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून मान्यता द्यावी यासह 23 मागण्यांचे निवेदन माध्यमिक विषय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.




























































