
सामना प्रतिनिधी । मुंबई
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी शिक्षक-कर्मचाऱ्यांना ध्वजारोहणाच्या सोहळय़ानंतर घरी जाता येणार आहे. याबाबत पालिकेने परिपत्रकही काढले आहे. मात्र या दोन्ही दिवसांची अर्धा दिवस सुट्टी मिळून वर्षाच्या एकूण 76 सुट्ट्यांमधील एक सुट्टी कमी होणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी सांगितले.
राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार शिक्षक-कर्मचाऱयांना ध्वजारोहणाच्या दिवशी दुपारी 1 वाजून 10 मिनिटांपर्यंत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते. अन्यथा संपूर्ण दिवसाची गैरहजेरी लागेल असेही स्पष्ट करण्यात आले होते. यामुळे ध्वजारोहण झाल्यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत करणार काय, असा प्रश्न शिक्षक-कर्मचाऱयांना पडला होता. शिवाय शिक्षक-कर्मचाऱयांची दोन दिवसांची गैरहजेरीही लागणार होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
‘बायोमेट्रिक’मुळे निर्णय
पालिका शाळांमध्ये शिक्षक-कर्मचाऱयांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र ध्वजारोहणाच्या दिवशी सकाळी आलेल्या शिक्षकांना संपूर्ण दिवसाची हजेरी लावण्यासाठी सायंकाळीही बायोमेट्रिक हजेरीसाठी थांबावे लागले असते.
त्यामुळे शिक्षक-कर्मचाऱयांना ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर जाण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र यामध्ये स्वातंत्र्यदिनी अर्ध्या दिवसाची सुट्टी व प्रजासत्ताकदिनी अर्ध्या दिवसाची सुट्टी धरून एका दिवसाची सुट्टी वर्षातील 76 सुट्टय़ांमधून कमी करण्यात येईल, असे मंगेश सातमकर यांनी सांगितले.































































