
विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिक्षकांची नेमणूक करण्यासाठी प्रशासनाकडून नेमणुकीचे पत्र देण्यात आले आहे. मात्र, संगमनेर येथील शासकीय आश्रम शाळेला मात्र निवडणुकीचे काम मिळाले नाही, म्हणून संबंधित शिक्षकांनी स्थानिक पातळीवर आम्हाला निवडणुकीचे काम मिळावे अशी लेखी मागणी येथील निवडणूक प्रशासनाला केली आहे. निवडणुकीचे काम राष्ट्रीय कर्तव्य आहे, या भावनेतून आम्ही ते करायला तयार आहोत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. काही ठिकाणी निवडणुकीचे काम नको म्हणून अनेक शिक्षकांची मागणी आहे. मात्र, संगमनेरमधील आश्रम शाळेच्या शिक्षकांनी एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
निवडणुकीचे काम करताना प्रशासकीय पातळीवर मतदान केंद्राच्या शिपायापासून तर ऑब्झर्वरपर्यंत नेमणूक करण्याची पद्धत आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार ही कामे केली जातात. विधानसभेच्या निवडणुकीसाठी नगरच्या प्रशासनाने संबंधित निवडणुकीसाठी कर्मचारी व अधिकारी नियुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून नेमणुका करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये माध्यमिक शाळेतील शिक्षकांचाही समावेश होता. तसेच जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. संगमनेर तालुक्यातील अनेक शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्यानंतर येथील असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील शिक्षकांना निवडणुकीचे काम देण्याबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. त्यामुळे या शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन आम्ही राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास तयार आहोत, आम्हाला निवडणुकीचे काम द्यावे अशी लेखी मागणी येथील जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. या शिक्षकांमध्ये एच.डी. गुळवे, एस. जी. पवार, पी. जे. वाकचौरे, एस. बी. कावरे, वैद्य,जठार, सानप व शिपाई बी. एन. लवांडे यांचा समावेश आहे



























































