
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड झाली अन् सिमेंट काँक्रीटची जंगलं उभी राहिली. त्यातच घराच्या अंगणातील पारंपरिक झाडांची जागा शोभिवंत झाडांनी घेतली. त्यामुळे घरटे तयार करण्यासाठी हक्काचा कोपरा चिऊताईला मिळेनासा झाल्याने तिने शहरांकडे पाठ फिरवली. शहरात हरवलेला चिमण्यांचा चिवचिवाट पुन्हा ऐकू यावा यासाठी सोलापुरातील मुकुंद शेटे हे शिक्षक गेल्या दहा वर्षांपासून ‘कृत्रिम घरटी कोपरा’ हा उपक्रम राबवतायत. त्यांच्या या उपक्रमामुळे सोलापूर शहरात चिमण्यांचा वावर वाढला आहे.
पर्यावरणप्रेमी मुकुंद शेटे हे चंद्रभागाबाई यलगुलकार प्रशाला या शाळेत शिक्षक आहेत. पक्षी निरीक्षणाचा त्यांना छंद आहे. वाढत्या शहरीकरणामुळे चिमण्यांची संख्या कमी होत असल्याने त्यादृष्टीने आपल्याला काही करता येईल का, असा विचार त्यांनी केला. अशा वेळी इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील वैभक जाधव आणि अर्जुन जाधव या पक्षी मित्रामुळे त्यांना ‘कृत्रिम घरटी कोपरा’ ही संकल्पना समजली. सुरुवातीला ही संकल्पना त्यांनी राहत असलेल्या बॉम्बे कॉलनीत राबवली. काही वर्षांपूर्वी अभावानेच चिमणी दिसणाऱ्या बॉम्बे कॉलनीत आता चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला आहे.
शेटे कुटुंबीय सध्या टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी कोपरा तयार करून त्याचे मोफत वाटप करतायत. आजवर त्यांनी दोन हजारांहून अधिक जणांना याचे वाटप केले आहे. आपल्या वन्यजीव प्रेमी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं शेकडो जखमी पक्ष्यांवर स्वखर्चातून उपचार केले आहेत. याशिवाय दरवर्षी पावसाळ्यानंतर ते हजारो झाडांचे पुनर्रोपण करतात.
अशी आहे संकल्पना…
चिमण्या स्वतःचे घरटे स्वतः तयार करतात. मात्र शहरात त्यांना घरटे बनवण्यासाठी हक्काचा कोपरा मिळत नाही. कृत्रिम घरटी कोपरा या संकल्पनेत त्यांना घरटय़ासाठी हक्काचा कोपरा तयार करून दिला जातो. अर्धा फूट पुठ्ठय़ाची नळी चिकटपट्टीच्या सहाय्याने एका बाजूने पूर्णपणे आणि दुसऱया बाजूने अर्धवट बंद केली जाते. ती नळी विशिष्ट ठिकाणी अडकवली जाते. चिमण्यांसह इतर पक्षी त्या नळीत येऊन आपले घरटे बनवतात.
‘चिऊताई ये… चारा खा, पाणी पी अन् भुर्रकन उडून जा,’ असे आपण म्हणतो. परंतु चिऊताईसाठी आपल्यापैकी किती जण चारा, पाणी ठेवतात हा प्रश्नच आहे. दुरावलेल्या चिमण्यांना पुन्हा आपल्याजवळ आणण्यासाठी आपण त्यांना घरटे तयार करण्यासाठी हक्काचा कोपरा उपलब्ध करून दिला पाहिजे.
-मुकुंद शेटे



























































