शिक्षकाचा नववीच्या विद्यार्थिनीकडे लग्नासाठी तगादा, त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
death

लग्नासाठी शिक्षकाकडून सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून नववीत शिकणाऱ्या मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना आळंदी येथे घडली. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यातून आळंदी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

संभाजी बारकू घोडविंदे (वय 32, रा. घोडविंदे पाडा, ता. वाडा, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी विरार येथे राहणाऱ्या मुलीच्या वडीलांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची मुलगी वाडा तालुक्यातील कुडुस येथील नॅशनल स्कुलमध्ये शिकत होती. आरोपी संभाजी हा मुलीचा शिक्षक आहे. तो मुलीला भेटून ’माझे तुझ्यावर प्रेम आहे, आपण लग्न करू, असे म्हणत सतत त्रास देत असे. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

डिसेंबर 2019 मध्ये मुलीच्या वडिलांनी मुलीला आळंदी येथील जोग महाराज व्यायाम शाळेत कुस्ती प्रशिक्षणासाठी पाठविले. तसेच सयाजीनाथ इंग्लीश माध्यम स्कुलमध्ये तिला नववीत प्रवेश घेण्यात आला. मात्र, आरोपी संभाजी याने मुलीचा पाठलाग सोडला नाही. सतत तिला कॉल करून त्रास देऊ लागला.

वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून मुलीने आळंदी येथे ढेकूण मारण्याचे औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मुलीवर पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात उपचार केल्यानंतर मुलीला भिवंडी येथील रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान 1 एप्रिल रोजी तिचा मृत्यु झाला. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिक्षक संभाजी याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. फौजदार लोहेकर तपास करत आहेत.