मसुरेत निवृत्त शिक्षकाचा मृतदेह गळफास स्थितीत

597

मालवणमधील मसुरे खाजणवाडी येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक अनिल सोनू गावकर (वय 62) यांचा मृतदेह खाजणवाडी येथील डोंगरी स्मशानभूमीनजीक झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आला. शुक्रवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. घटनास्थळानजीक काही अंतरावर गावकर यांची मोटारसायकल उभी केलेली आढळून आली. त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अनिल गावकर यांनी मसुरे देऊळ वाडा येथील जी. प. शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्ती स्वीकारली होती. निवृत्तीनंतर ते मुंबई तसेच खाजणवाडी येथे राहत होते. त्यांची पत्नी व मुले कामानिमित्त मुंबईत असतात. गावातील सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. येथील ग्राम उत्कर्ष मंडळाचे ते पदाधिकारी होते. मसुरेचे सहाय्यक पोलीस संतोष नांदोस्कर, व्ही. व्ही. परांडे, ए. टी. जयभाय अधिक तपास करीत आहेत. मानसिक संतुलन बिघडल्याने अनिल गावकर यांनी आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्यावर शनिवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्यापश्चात पत्नी, मुली, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या