बारावी बोर्डाच्या परीक्षेवर शिक्षकांचा बहिष्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृति समितीच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. बोर्डाच्या बारावीच्या सुपरव्हिजन, पेपर तपासणी तसेच सर्व कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाच्या परीक्षेचे कोणतेही कामकाज प्राध्यापकांना देवू नये, अशा मागणीचे निवेदन माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांना बुधवारी (दि.20) देण्यात आले. दरम्यान, बारावी परीक्षेच्या पूर्वसंध्येलाचा शिक्षकांनी परीक्षेवर बहिष्कार टाकल्याने बोर्डाची मोठी धांदल उडण्याची शक्यता आहे.

विना अनुदानित उच्च माध्यमिकशाळा कृति समितीच्या विविध मागण्यांसाठी मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात आंदोलन केले. त्या आंदोलनाचा सरकारवर तसेच, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. या आंदोलनाची काहीही दखल घेतली गेली नाही. विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक कमी पगारात अध्यापनाचे काम करत आहेत. परिवाराचा गाडा कमी पैशांत कसा हाकायचा? असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे आता आत्महत्यांची वेळ प्राध्यापकांवर येऊन ठेपली आहे. सरकार आणि शिक्षणमंत्री तावडे यांनी नेहमीच शिक्षकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. त्यामुळे जोपर्यंत पगार सुरू नाही तसेच अनुदान दिले जात नाही तोपर्यंत 12 वी बोर्डच्या परीक्षेचे सुरपव्हिजन करणार नाही. तसेच, बोर्डाचे उत्तरपत्रिका तपासणीही नाही असा इशारा विना अनुदानित उच्च माध्यमिकशाळा कृति समितीने दिला आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्राध्यापकांनी प्रात्यक्षिक तसेच, तोंडी परीक्षाही सुरळीतपणे पार पाडल्या. मात्र, सरकारने मागण्या मान्य न केल्याने 12 बोर्ड परीक्षेच्या सर्व कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

यावेळी कृति समितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सचिन पालवे, प्रा. सुभाष चिंधे, प्रा. संजय शेवाळे, प्रा. लक्ष्मण बेळगे, प्रा. देवीदास हरवणे, प्रा. दीपक बोरुडे, प्रा. श्रीरंग धामणे, प्रा.रवींद्र घायतडक, प्रा. अभिमन्यू गायकवाड, प्रा. ज्ञानेश्‍वर बर्डे, प्रा. उमादेवी शेळके, प्रा. कल्पना तुपे, प्रा. विद्या कदम, प्रा. सुवर्णा राहिंज, प्रा. प्रवीण पाटील, प्रा. किशोर सप्रे, आदी उपस्थित होते.

आत्महत्येशिवाय पर्याय नाही
गेल्या 17 वर्षांपासून ज्ञानदानाचे काम करणार्‍या उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने अनुदान देत पगार सुरू न केल्यास प्राध्यापकांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याची खंत प्राध्यापकांनी यावेळी व्यक्त केली. आत्महत्या केल्याशिवाय सरकारला जाग येणार नसेल तर त्याची पण प्राध्यापकांची तयारी असल्याचेही यावेळी अनेकांनी बोलून दाखविले.