
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता निफाड तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी जवळपास 4 लाख 58 हजार रुपयांचा सामुदायिक निधी जमवून आरोग्याच्या दृष्टीने 40 सेमी फॉवलेर बेड, 250 फेसशिल्ड, 10 नेब्युलायझर सेट, 30 व्हेपोरायझर सेट आरोग्य विभागाला साहित्य वाटप उपलब्ध करून दिले.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अपुरी बेड संख्या आणि हतबल झालेली आरोग्य यंत्रणा यामुळे आपण आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य करावे असा भावनिक विचार करून तालुक्यातील शिक्षक बांधवानी सामुदायिक निधी जमा केला. निधी जमा करताना कोणावरही सक्ती करण्यात आली नाही. जमा झालेल्या निधीतून तालुक्यातील दहा प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी चार बेड, कोरोना काळात सर्वेक्षण आणि इतर कामे करणाऱया आशा वर्कर यांना फेसशिल्ड, नेब्युलायझर सेट, व्हॅप्युरायझर सेट यांचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे साहित्यरूपाने शिक्षकांनी दिलेले योगदान हे कोरोना रुग्णांना दिलासा आणि प्रशासनाला सहकार्य करणारे असून त्यांचे योगदान तालुक्यातील जनता कधीच विसरणार नाही. इतर कर्मचाऱयांनी शिक्षकांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. पंचायत समिती सभापती सुलभा पवार, पंचायत समिती सदस्य शिवा पाटील सुरासे, बंडू आहेर, सामाजिक कार्यकर्ते शंकर संगमनेरे तसेच प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पाठारे, गटविकास अधिकारी संदीप कराड, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार, तालुका वैद्यकीय अधिकारी राठोड उपस्थित होते.

























































