
मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी शाळा वाचविण्यासाठी राज्यातील मराठी शाळा संस्थाचालकांनी मराठीप्रेमींना साद घातली आहे. मराठी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची पदभरती, भौतिक सोयीसुविधांसाठी वेतनेतर अनुदान, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱयांच्या नेमणुका करणे आवश्यक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वारांवार पाठपुरावा करूनदेखील काहीच उपयोग न झाल्याने अखेर संस्थाचालकांनी मराठी भाषाप्रेमींना साकडे घातले आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व समाजातील इतर मराठी शाळाप्रेमींकडून मराठी शाळांना पाठिंबा दर्शविण्यासाठी गुगल फॉर्म भरून घेतला जात आहे.
राज्यातील शाळांचे प्रलंबित प्रश्न, मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दहावी-बारावीच्या परीक्षाविरोधात असहकार आंदोलन पुकारले आहे. शिक्षक भरती, वेतनेतर अनुदान आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती या मागण्यांच्या पूर्ततेसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. महामंडळाने केलेल्या मागण्यांना मराठी शाळा संस्थाचालक संघाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच आतापर्यंत अनेकदा हा विषय शासनदरबारी मांडूनही काहीच परिणाम न झाल्याने दबाव गट तयार करण्याचा निर्णय संस्थाचालक संघाने घेतला आहे. मराठी शाळांना वाचविण्यासाठी मराठीप्रेमींनी गुगल फॉर्मवर पाठिंबा दर्शवावा. लोकांच्या पाठिंब्याचे निवेदन राज्य सरकारला सादर करणार असल्याचे मराठी शाळा संस्थाचालक संघाने स्पष्ट केले.
पुढील सात दिवस गुगल फॉर्मद्वारे पाठिंबा देता येणार
मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येलाच मराठी शाळा टिकविण्यासाठी पाठिंबा दर्शविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आल्याचे मराठी शाळा संस्थाचालक संघाचे सुशील शेजुळे यांनी सांगितले. मराठी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण हवे असेल तर सोयीसुविधा पुरवणे आवश्यक असून पुढील सात दिवस गुगल फॉर्मद्वारे मराठी शाळांना पाठिंबा दर्शविता येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेतील शिपाई पदेही रिक्त आहेत. अशा परिस्थितीत या शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे, असेही शेजुळे यांनी सांगितले.

























































