
खासगी प्राथमिक शाळांना सातव्या वेतन आयोगासह थकबाकी मिळावी, 104 विनाअनुदानित शाळांना 100 टक्के अनुदान देण्यात यावे, विद्यार्थ्यांना 27 मोफत वस्तू आणि आरटीईनुसार मोफत शिक्षण मिळावे या मागण्यासाठी आजपासून शिक्षक भारती संघटनेने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. पालिका शिक्षणाधिकाऱयांसोबत चर्चेच्या दोन बैठका यशस्वी न झाल्याने प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदान येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू करत असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस जालिंदर सरोदे यांनी दिली.
आरोग्यक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱया महानगरपालिकेने शिक्षण क्षेत्राकडे मात्र दुर्लक्ष केले आहे, असा आरोप शिक्षक भारतीने केला आहे. पालिकेने आपल्या 1 लाख कर्मचाऱयांना सातवा वेतन आयोग दिला. परंतु खाजगी प्राथमिक शाळांतील केवळ 3900 शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱयांना 5 वर्षे होऊनही सातवा वेतन आयोग दिलेला नाही. या अन्यायामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाय 500 शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी महानगरपालिकेकडे गेली 15 वर्षे अनुदान मागत आहेत.
गांधी जयंतीपासून आझाद मैदानात कोविड नियमांचे पालन करून सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत नंदा कांबळे, मनीषा घार्गे, वैशाली सावंत आणि उमा तिर्लोटकर आंदोलन केले. दररोज चारजण सुरक्षित अंतर ठेवून बेमुदत साखळी उपोषण करणार आहेत. आजच्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुभाष मोरे, सरचिटणीस जालिंदर सरोदे, शिक्षक भारती मुंबई अध्यक्षा कल्पना शेंडे, शिक्षक भारती उत्तर विभाग अध्यक्ष खान मो. अकबर, भाऊसाहेब पानमंद, सुधाराम देशमुख, विजय बाविस्कर, धोंडीराम दळवी, श्रीकांत आयरे, चंद्रकांत परब आदी सहभागी झाले.


























































