शिक्षकांचा महाआक्रोश ‘ऐकनाथ’ शिंदेंपर्यंत पोहोचेना, रणरणत्या उन्हात आझाद मैदानात आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्ही आमदारांच्या-मंत्र्यांच्या पाया पडलो, मुख्यमंत्र्यांना-शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले, पण सरकारने आमच्या मागण्यांची दखलच घेतली नाही. आमचा वनवास काही संपत नाही. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही हे आमचे दुर्भाग्य आहे, अशी व्यथा ऑक्टोबर हिटच्या रणरणत्या उन्हात महाआक्रोश आंदोलन पुकारणाऱया शिक्षकांनी व्यक्त केली.

राज्यातील खासगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व वर्ग तुकडय़ांतील 65 हजार विना आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना जून 2014 व नोव्हेंबर 2015 मधील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाने आझाद मैदानात बेमुदत महाआक्रोश आंदोलन पुकारले आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही या निर्धाराने आंदोलन सुरू आहे. सकाळपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आंदोलन सुरू असते. त्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांचे प्रतिनिधी हे आमदार व मंत्र्यांच्या भेटी घेतात. शिक्षकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे, पण अजूनपर्यंत सरकारने या शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. सहाशेहून अधिक शिक्षक या महाआक्रोश आंदोलनात सहभागी झालेले आहेत. ऑक्टोबरच्या रणरणत्या उन्हात शिक्षक आझाद मैदानात ठिय्या देऊन आहेत.

यासंदर्भात अघोषित शिक्षक महासंघ या शिक्षकांच्या संघटनेचे निमंत्रक बबन पाटील येवले यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी मागील महिन्यात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनी आमच्या मागण्यांचा प्रश्न शिक्षणमंत्र्यांकडे सोपवला. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी आम्हाला मागण्यांची पूर्तता करण्यासाठी दोन महिन्यांचा वेळ मागितला. आम्ही तो दिला, पण आता परत त्यांनी मुदत वाढवून मागितली आहे. त्यामुळे आम्हाला आता शिक्षकमंत्र्यांना भेटायची इच्छा नाही. आता आम्हाला मुख्यमंत्र्यांचीच भेट हवी आहे. आम्ही आमदारांच्या पाया पडलो, पण आमची कोणी दखल घेत नाही अशी शिक्षकांची व्यथा असल्याचेही बबन पाटील येवले यांनी सांगितले.