ऑस्ट्रेलियाला हिंदुस्थान दौरा महागात पडणार, सुरक्षा व आरोग्यासाठी 30 मिलीयन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचे बजेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा क्रिकेट संघ नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. कोरोनामुळे आर्थिक चणचण सोसावी लागणाऱया क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी हा दौरा नवसंजीवनी देण्याचे काम करणार आहे. मात्र या दौऱयाची जुळवाजुळव करताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पुरती दमछाक उडाली आहे.

हिंदुस्थानचा ऑस्ट्रेलियन दौरा व स्थानिक बिग बॅश लीग या दोन महत्त्वाच्या मालिका सुरक्षित वातावरणात खेळविण्यासाठी त्यांच्याकडून 30 मिलीयन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा खर्च करण्यात येणार आहे. याचाच अर्थ टीम इंडियाचा हा दौरा त्यांना महागात तर पडणार नाही ना… असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती क्रिकेट ऑस्ट्रेलियाला वाटू लागली आहे. त्यामुळे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, अधिकारी यांच्या सुरक्षेसह आरोग्याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. यासाठी चार्टर फ्लाइट, कोविड किट, हॉटेलच्या कानाकोपऱयातील सुविधा या सर्वच बाबींवर गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे बजेटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियातील एका सूत्रांकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

कोरोनामुळे झालेले नुकसान भरायचेय
कोरोनामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मोठे नुकसान सहन करावे लागले. संघटनेतील बहुतांशी व्यक्तींना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. तसेच काहींच्या पगारात कपातही करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी हिंदुस्थान दौऱयामधून कोरोनाच्या काळात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया प्रयत्न करणार आहे.