
फिरकीपटू युझवेंद्र चहल याने याच महिन्यात आपला साखरपुडा उरकून घेतला. आता या यादीत टीम इंडियाचा आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले आहे. 29 वर्षीय अष्टपैलू खेळाडू विजय शंकर बोहल्यावर चढणार असून साखरपुड्याचे फोटो शेअर करत त्याने ही खुशखबर चाहत्यांना दिली आहे.
विजय शंकर आणि वैशाली विश्वेश्वरन यांचा साखरपुडा पार पडला असून त्याने इन्स्टाग्रामवर हे साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. गेल्या वर्षी वर्ल्डकप खेळलेल्या शंकरने आयपीएल 2020 साठी यूएईला रवाना होण्यापूर्वी साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. यानंतर चाहते आणि सहकारी खेळाडू यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

केएल राहुल, युझवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, करुण नायर, आर. अश्विन, सिद्धार्थ कौल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसेच आयपीएल फ्रेंचाइजी सनराइजर्स हैदराबाद (SRH) देखील विजय आणि वैशाली यांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
Congratulations to @vijayshankar260 and Vaishali on their engagement 💍🧡#OrangeArmy #SRHFamily pic.twitter.com/zrpGqlit0X
— SunRisers Hyderabad (@SunRisers) August 20, 2020
दरम्यान, तमिळनाडूच्या या खेळाडूने मार्च 2018 ला श्रीलंकेविरुद्ध कोलंबो येथे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. तर जानेवारी 2019 ला मेलबर्न येथे तो आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 च्या वर्ल्डकपमध्ये तो टीम इंडियाचा सदस्य होता.

विजय शंकर हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो सनराइडर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. आतापर्यंत त्याने 33 लढतीत 11 वेळ नाबाद राहून 30.94 च्या सरासरीने 557 धावा चोपल्या आहेत, तसेच कामचलाऊ गोलंदाजी करून 2 बळी देखील घेतले आहेत.


























































