हिंदुस्थानचा वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला धक्का; प्रसिध कृष्णा,कृणाल पांडय़ा यांचा पदार्पणात पराक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विठ्ठल देवकाते  

हिंदुस्थानच्या संघाने मंगळवारी वन डे क्रिकेटमधील वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला 66 धावांनी पराभवाचा धक्का दिला. वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा व अष्टपैलू खेळाडू कृणाल पांडय़ा यांचा पदार्पणात पराक्रम… टी-20 मालिकेत अपयशी ठरलेल्या शिखर धवन व लोकेश राहुलचे झोकात पुनरागमन… अन् विराट कोहली व शार्दुल ठाकूर यांनी कायम ठेवलेला शानदार फॉर्म… ही टीम इंडियाच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. या विजयासह विराट सेनेने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 98 धावांची खेळी साकारणाऱया शिखर धवनची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

बेअरस्टो -रॉयची खणखणीत सलामी

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 318 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लडला 251 धावसंख्येपर्यंतच मजल मारता आली. खरं तर जॉनी बेअरस्टो (94) व जेसन रॉय (46) यांनी 14.2 षटकांत 135 धावांची सलामी देत इंग्लडला खणखणीत सुरुवात करून दिली. प्रसिद्ध कृष्णाने रॉयला बदली खेळाडू सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद करून ही डोकेदुखी ठरू पाहणारी जोडी फोडली. रॉयने 35 चेंडूंत 7 चौकारांसह एक षटकार लगावला. कृष्णाने पुढच्याच षटकात धोकादायक बेन स्टोक्सला (1) बदली खेळाडू शुभमन गिलकरवी झेलबाद करून हिंदुस्थानला दुसरे यश मिळवून दिले.

ठाकूरचा दणका

पहिल्या स्पेलमध्ये मार खाणाऱया शार्दुल ठाकूरने दुसऱया स्पेलमध्ये मधली फळी कापून काढत इंग्लंडच्या डावाला भगदाड पाडले. त्याने जॉनी बेअरस्टोला (94) कुलदीपकरवी झेलबाद करून त्याला शतकापासून वंचित ठेवले. बेअरस्टाने 66 चेंडूंत 6 चौकारांसह 7 षटकारांचा घणाघात केला. त्यानंतर कर्णधार ओएन मॉर्गन (22) व जोस बटलर (2) यांना बाद करून इंग्लंडच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. त्यानंतर सॅम बिलिंग (18) व मोईन अली (30) हे बाद झाल्यानंतर इंग्लडचा पराभव निश्चित झाला. हिंदुस्थानकडून प्रसिध कृष्णाने 54 धावांत 4 फलंदाज बाद केले, तर ठाकूरने 37 धावांत 3 गडी टिपले. भुवनेश्वर कुमारला 2, तर कृणाल पांडय़ालाही 1 बळी मिळाला.

वेगवान अर्धशतकाचा विक्रम

पदार्पणाच्या सामन्यात वेगवान अर्धशतक झळकवण्याच्या विश्वविक्रम कृणाल पांडय़ाने केला. त्याने 25 चेंडूंत अर्धशतक झळकावून न्यूझीलंडच्या जॉन मॉरिसचा 31 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. यावेळी कृणाल याला वडिलांच्या आठवणीने अश्रू आवरता आले नाही. मॉरिसने पदार्पणाच्या लढतीत 35 चेंडूंत वेगवान अर्धशतक ठोकले होते.

कृणाल-राहुलची फटकेबाजी

धवनच्या जागेवर आलेला लोकेश राहुल (नाबाद 62) आणि हार्दिक पांडय़ा (1) अपयशी ठरल्यानंतर राहुलला साथ देण्यासाठी आलेला कृणाल पांडय़ा (नाबाद 58) यांनी अखेरच्या काही षटकांमध्ये जबरदस्त फटकेबाजी केली. या दोघांनी 57 चेंडूंत 112 धावांची अभेद्य भागीदारी करून हिंदुस्थानला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. कृणालने 31 चेंडूंत 7 व 2 षटकारांसह आपली 58 धावांची नाबाद खेळी सजवली.