
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ‘टीम इंडिया’च्या निवड समिती सदस्यांच्या मानधनात गुरुवारी भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता संघ निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांना वर्षाला तब्बल एक कोटी रुपये मानधन मिळणार आहे.
नव्या मानधनवाढीनुसार आता निवड समिती सदस्य शरणदीप सिंग आणि देवांग गांधी यांच्या मानधनात ३० लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या दोघांचे मानधन आता ९० लाख रुपये एकढे होणार आहे. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा पगार २० लाख रुपयांनी वाढणार आहे. यापूर्वी प्रसाद यांना वर्षाला ८० लाख रुपये मानधन मिळत होते. नव्या मानधन वाढीनुसार ते आता कोट्यधीश झाले आहेत. हिंदुस्थानचे माजी यष्टिरक्षक साबा करीम यांच्या अध्यक्षतेखालील ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट ऑपरेशन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मानधनवाढीचा प्रस्ताव हा १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने ठेवला होता.
… पण करारात वाढ होणार नाही
‘बीसीसीआय’ची सुधारित घटना तयार झाल्यास एमएसके प्रसाद ऍण्ड कंपनीच्या करारात वाढ होण्याची चिन्हे दिसत नाहीत. निवड समिती सदस्य हे सात कसोटी, दहा वन डे व ३० प्रथमश्रेणी सामने खेळलेले असावेत असा नवा नियम असणार आहे. त्यामुळे प्रसाद ऍण्ड कंपनीऐवजी पाच नवीन सदस्य या समितीत दिसतील.




























































