टीम इंडियाचा सलग 12 वा विक्रमी टी-20 विजय; अफगाणिस्तानच्या विक्रमाची केली बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रोहित शर्माच्या टीम इंडियाने श्रीलंकेवर 6 गडी आणि 19 चेंडू राखून धूळ चारत सलग 12 टी-20 लढती जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयासह हिंदुस्थानने अफगाणिस्तानच्या सलग 12 विजयाच्या विक्रमाची बरोबरी केली. रोमानियानेही सलग 12 टी-20 लढती जिंकलेल्या आहेत, मात्र या संघाला कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळालेला नाही.

श्रेयस अय्यरचा श्रीलंकेला तडाखा

श्रीलंकेकडून मिळालेल्या 147 धावांचे लक्ष्य हिंदुस्थानने 16.5 षटकांत 4 फलंदाजांच्या मोबदल्यात पूर्ण केले. इशान किशन जायबंदी असल्यामुळे संजू सॅमसनने रोहित शर्माच्या साथीने डावाची सुरुवात केली, मात्र वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने रोहितला (5) करुणारत्नेकरवी झेलबाद करून श्रीलंकेला सनसनाटी सुरुवात करून दिली. मात्र रोहितच्या जागेवर आलेल्या श्रेयस अय्यरने श्रीलंकन गोलंदाजी निप्रभ ठरवीत हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 45 चेंडूंत नाबाद 73 धावा करताना 9 चौकारांसह 1 षटकार ठोकला. हिंदुस्थानचे धावफलकावर अर्धशतक लागल्यानंतर करुणारत्नेने सॅमसनला (18) यष्टीमागे चंडिमलकरवी झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या दीपक हुडाने संघासाठी 21 धावा जोडल्या. संघाचे शतक फलकावर लावण्यापूर्वी श्रेयसने आपले अर्धशतक पूर्ण केले. जलदगती गोलंदाज लाहिरू कुमाराने व्यंकटेश अय्यरला (5) स्वस्तात बाद करत हिंदुस्थानला चौथा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या रवींद्र जाडेजाला सोबत घेत श्रेयसने 17 व्या षटकांत टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

शनाकाची पुन्हा फटकेबाजी

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 5 बाद 146 धावसंख्या उभारली. श्रीलंकेचा संघ धावांची शंभरीदेखील गाठेल की नाही, असे वाटत असताना कर्णधार दासुन शनाकाची बॅट पुन्हा एकदा तळपली. त्याने चमिका करुणारत्नेला (12) हाताशी धरून हिंदुस्थानी गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने 38 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 74 धावांची खेळी सजवली. शनाका-करुणारत्ते जोडीने सहाव्या गडय़ासाठी 86 धावांची अभेद्य भागीदारी केल्यामुळे श्रीलंकेला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. हिंदुस्थानकडून आवेश खानने 2, तर मोहम्मद सिराज, हर्षल पटेल व रवी बिष्णोई यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. श्रेयस अय्यरलाच मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज असे दोन्ही पुरस्कार देण्यात आले.